छत्रपती संभाजीनगर : जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी गेलेले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर माणिक इन्फ्रा या कंत्राटदारास विशेष सवलत दिल्याचा आरोप होता. हा कंत्राटदार जरांगे यांच्या जवळचा असून त्यांना खास वागणूक दिली जात असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांच्यावर केला जात होता. विविध पक्षांबरोबर विविध कंत्राटदार जोडलेले असतात. तसेच ‘माणिक इन्फ्रा’चेही असेल. पण त्यांनी नियमात राहून निविदा भरल्या असतील तर त्यांना कामे दिली गेली असतील. पण त्यांच्यासाठी विशेष सवलत दिली नव्हती असे राधाकृष्ण विखे म्हणाले. या कंपनीला ७०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कंत्राटे दिली असल्याचा आरोप केला जात होता.
या कंपनीचा कंत्राटदार व्यक्ती किशोर बलांडे हे जरांगे पाटील यांच्याबरोबर असतात. आज या अनुषंगाने राधाकृष्ण विखे यांना विचारले असता या कंपनीला कोणतीही विशेष सवलत देण्यात आली नाही, एवढाच खुलासा त्यांनी केला. जरांगे यांचे आंदोलन थांबवण्यासाठी कंत्राटदारांना नोटीस देण्याची चर्चा सुरू झाली होती. समाज माध्यमात या कंपनीला किती रुपयांची कामे जलसंपदा विभागातून दिली याची आकडेवारी होती. ही आकडेवारी आपणही पाहिली असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी मान्य केले. पण विविध कंत्राटदार विविध पक्षांशी जोडलेले असतात.
तसे माणिक इन्फ्राचेही असेल. पण त्यांना नियमांच्या पलिकडे जाऊन कोणतीही मदत केली नव्हती, असे राधाकृष्ण विखे म्हणाले.
जरांगे यांच्या जवळच्या काही व्यक्तींना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिल्याचा आरोप केला जात होता. या कंत्राटातील घोळ आणि त्यावरुन सक्त वसुली संचालनालयाच्या नोटीसांचीही समाज माध्यमांमध्ये चर्चा होती. यावर विखे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत स्पष्टीकरण दिले. जरांगे आंदोलन सोडविण्यासाठी सरकारकडून आणि विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कोणते हातखंडे वापरण्यात आले, याची चर्चा सुरू होती. यात माणिक इन्फ्राचे नाव चर्चे आले होते.
