छत्रपती संभाजीनगर :  विपुल पाणी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील महापालिकेस तुटीच्या खोऱ्यातील धरणातून पाणी आरक्षण कशासाठी, असा प्रश्न करत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आक्रमक झाले. यामुळे आरक्षण जाहीर करताना अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर उघडकीस आल्या. परिणामी पाणी आरक्षण रद्द करण्याचा ठराव सल्लागार समितीच्या बैठकीत मंजूर करून तो जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आणि आमदार बंब यांच्या भूमिकांमुळे पाणी वितरणाची सगळी आकडेवारी शेतकऱ्यांसमोर जाहीर करावी अशी भूमिका घेतली. मी पाणी अडवून ठेवतो, अशी टीका नेहमी होत असते. तसे होऊ नये म्हणून पाणी वितरणाची सगळी आकडेवारी शेतकऱ्यांना सांगावी, असेही विखे म्हणाले.

मुकणे, भाम, भावली आणि वाकी या चार धरणातून मराठवाड्यातील वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यांना सिंचनासाठी नांदूरमधमेश्वरमधून  पाणी दिले जाते. यासाठी जलदगती कालवाही तयार करण्यात आला. पण पाण्याचे आरक्षण टाकताना जलसंपदा विभागातील अधिकारी  जाणीवपूर्वक मराठवाड्याच्या हक्काचे पाणी डावलतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या आरोपाला पुष्टी देण्यासाठी कोणत्या धरणात किती पाणी उपलब्ध आहे, याची माहिती मिळवून वैजापूरचे शेतकरी पंडित शिंदे उपोषणास बसले होते.

या उपोषणास भाजपचे दिनेश परदेशी यांनीही पाठिंबा दिला. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे हेही आक्रमक होते. नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली आणि वाकी या चार धरणात १०. ५७ अब्ज घनफूट पाणी शिल्लक असताना केवळ ३.०५ अब्ज घनफूट पाण्याचे आवर्तन देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला होता. पण अधिक पाणी असताना आणि चुकीचे आरक्षण असल्याने दुष्काळी स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पंडित शिंदे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस रुग्णवाहिकेतून आले. आवर्तनाच्या वेळापत्रकावरही शेतकऱ्यांचे आक्षेप होते. नाशिक जिल्ह्यातील पिके वेगळी आहेत. वैजापूर आणि गंगापूरमध्ये कांदा पीक अधिक घेतले जाते. यामुळे पाणी वितरणाच्या वेळा पत्रकावरुन आक्षेप होते.

वैजापूरचे शेतकरी आंदोलनात उतरलेले असताना गंगापूरची बाजू आमदार प्रशांत बंब यांनी आक्रमकपणे लावून धरली. नाशिक आणि इगतपुरी येथील पाणी आरक्षण  मराठवाड्यास अनुज्ञेय असणाऱ्या पाण्याशिवाय व्हायला हवे. पण तसे होत नाही. मराठवाड्याच्या पाण्याच्या हक्कात या दोन शहरांचा पाणीपुरवठा कसा ?  पूर्वी नियोजनात ०.९७ दलघमी आरक्षित करण्यात आले होते. तसेच चार धरणातून होणारा वहन व्यय आणि बाष्पीभवनामुळे रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने देता येतील, असे अधिकारी सांगत होते. या आकडेवारीवर आमदार बंब यांनी आक्षेप नोंदवले. जलसंपदा मंत्र्यांना आकडेवारीतील धोरणात्मक चुका लक्षात आल्यानंतर त्यांनी चुकीचे आरक्षण रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. आता तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. आक्रमक भूमिकेमुळे पहिल्या आवर्तनात अर्धा टीएमसी पाणी वाढवून देण्याचा निर्णय झाला. पाणी प्रश्नासाठी मराठवाड्यातील दोन तालुक्यांतील शेतकरी आक्रमक झाल्याने आमदार प्रशांत बंबही आक्रमक झाल्याचे दिसून आले.

 नव्या निर्णयामुळे अधिक पाणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे दुष्काळात वैजापूर आणि गंगापूर भागातील गोदापट्टयात उन्हाळी कांदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल तसेच चारा लागवडही वाढेल, असा दावा केला जात आहे.