राहाता:लोणी येथील कुरकुटे वस्ती शिवारातील शृंखला वसतिगृहाच्या मागील बाजूस दुपारी ३.३० च्या सुमारास शेतात पाणी भरत असलेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला तर दुसऱ्या घटनेत हणमंतगाव येथेही भरदुपारी अद्विक घोलप (वय ३.५ वर्ष) हा बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावाला. प्रवरा परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने शेतकरी, महिला, लहान मुले तसेच पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिली घटना लोणी येथे घडली. या घटनेत रविंद्र रावसाहेब शिंदे (वय २७) व पत्नी असे दोघे संतोष लक्ष्मण कुरकुटे यांच्या शेतात पाणी भरताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्या अचानक त्यांच्या जवळ आला त्याने त्यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षितपणे हल्ल्यामुळे शिंदे यांची धांदल उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य प्रविण विखे, संदीप गोसावी यांनी मदतकार्य केले.
दुसरी घटना तालुक्यातील हणमंतगाव येथे घडली. येथे चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून दुसऱ्या दिवशी त्याच भागात पुन्हा एका शेतकऱ्याचा पाठलाग केला. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अजिंक्य विलास घोलप यांच्या वस्तीवरील कोंबड्यांचा फडशा पडला. आज दुपारी १ वा. पुन्हा बिबट्या वस्तीवर आला व कोंबड्यांवर हल्ला केला. जवळच खेळत असलेल्या अद्विक अजिंक्य घोलप या लहान मुलाकडे पाहत पाहत होता. योगायोगाने शेजारील वस्तीवरील साक्षी सुनिल घोलप या मुलीचे लक्ष गेले आणि तीने धावत जाऊन अद्विकला उचलले व गोठ्यात पळाली. साक्षीच्या प्रसंगावधानाने अद्विक बचावला.
त्यांनी ताबडतोब मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांना माहिती दिली. वनविभागाने या परिसरात तीन पिंजरे लावले आहेत. थर्मल ड्रोनने बिबट्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. परंतु बिबट्या पिंजऱ्यात अडकायला तयार नाही. या परिसरात मादी बिबट्या पिलांसह फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या बिबट्याने आपल्या अधिवासाच्या सुरक्षेसाठी हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जाते. वनविभागाने तातडीने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
