नांदेड : ‘आप तो हमारे घर आए थे…’ छोट्याशा रिदयाने खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांपूर्वीच्या त्यांच्या नायगाव भेटीचे स्मरण करून देताच तिला मोठ्या ममत्वाने जवळ घेत काँग्रेसच्या या नेत्याने नांदेडचे माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच चव्हाण परिवाराची ख्यालीखुशालीही विचारली.
नायगाव तालुक्याच्या राजकारणात दीर्घकाळ आपला प्रभाव राखलेले माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र प्रा. रवींद्र हे चालवत असून नाशिक येथील काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपापूर्वी चव्हाण दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांशी खा. गांधी यांनी काहीवेळ आत्मीय संवाद साधला.
खा. रवींद्र आणि सोनिया या चव्हाण दाम्पत्याची कन्या रिदया जेमतेम आठ वर्षांची. दोन वर्षांपूर्वी या कुटुंबाचे प्रमुख वसंतराव यांचे खासदार झाल्यानंतर जेमतेम तीन महिन्यात निधन झाल्यानंतर खा.राहुल गांधी दिल्लीहून नांदेडला व येथून नायगाव बाजार या गावाला चव्हाण परिवाराच्या भेटीसाठी गेले होते. त्या दुःखद प्रसंगामध्ये या कुटुंबातील बच्चे कंपनीला राहुल यांच्याशी बोलता आले नाही किंवा त्यांच्या जवळ जाण्याची संधीही मिळाली नाही; पण दोन वर्षांनंतर याच नेत्याच्या व्यक्तिगत भेटीचा योग आला तेव्हा या चिमुकलीने राहुल यांना त्यांच्या नायगाव भेटीची आठवण करून दिली. त्यावर हां हां असे म्हणत तुम्हारे दादाजी गये तब में आया था, असे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी चव्हाण दाम्पत्याच्या राजवंश या पुत्राचीही विचारपूस केली. क्या करते हो, क्या बनना चाहते हो, असे त्यांनी विचारताच राजवंशने ‘मी अभियंता होणार’ असे विश्वासपूर्वक सांगितले. राहुल गांधी यांना प्रत्यक्ष भेटण्याची-बोलण्याची संधी मिळाल्यामुळे खासदार पत्नी सोनिया या तर भारावून गेल्या होत्या. आज आम्हां सर्वांच मन भरून आलं, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ही बाब आमच्या कायम लक्षात राहील, असे चव्हाण कुटुंबाने भेटीदरम्यान नमूद केले.
काँग्रेस पक्षाचे वरील शिबिर २४ ऑगस्ट रोजी नाशिक शहराजवळील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये आयोजित केले गेले होते. शिबिराच्या समारोपास राहुल गांधी येणार हे आधीच जाहीर झाले होते; पण दिवसभराच्या वास्तव्यात ते प्रत्येक जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांस भेटणार ही बाब शिबिरादरम्यान सर्वांना सांगण्यात आली. त्यानंतर खा. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या परिवारास नाशिक येथे बोलावून घेतले.
वरील शिबिराचा बुधवारी समारोप झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली. ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत झालेल्या या शिबिरामुळे महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेस जिल्हाध्यक्षांना पुढील कामांची दिशा मिळाली. काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव या शिबिरातील वेगवेगळ्या सत्रांतून वृद्धिंगत झाली, तर राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच नवी ऊर्जा आणि स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसला अच्छे दिन येतील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्रातील एक खासदार या नात्याने माझा संपर्क आहेच; पण आता पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी टाकली असून या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाच्या शिस्तबद्ध शिबिराचा अनुभव मिळाला. त्यातून पक्ष संघटना बांधणीसाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन मिळाले. खा.गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व इतर नेत्यांनी शिबिरामध्ये सर्वांचा आत्मविश्वास जागवला. येणार्या काळात काँग्रेसला अच्छे दिन येतील, असा विश्वास या शिबिराने निर्माण केला. – खासदार रवींद्र चव्हाण
