जालना : रेल्वे रुळांच्या देखभालीच्या कामामुळे करण्यात सायंकाळी सव्वा चार वाजता छत्रपती संभाजीनगर येथून सुटणारी गुंटूर एक्स्प्रेस ६५ दिवस जालना येथून सुटणार आहे. तर सायंकाळी सव्वा सहा वाजता जालना स्थानकावर येणारी काचीगुडा ते नगरसोल एक्स्प्रेस ६५ दिवस दीड तास उशीरा येणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांची ऐन उन्हाळ्यात मोठे हाल होणार आहेत.
४ फेब्रुवारी ते २७ मे मध्ये करमाड ते जालना दरम्यान यंत्राद्वारे खडी स्वच्छ करण्यात येणार आहे. पावसाळयात रेल्वे मार्गावरील पाण्याचा निचरा होणे, खडीची स्वच्छता होऊन रुळांची पकड मजबूत झाल्याने गाड्यांचा वेग आणि सुराक्षितता वाढण्यासाठी हे काम करण्यात येत आहे.
यामुळे छत्रपती संभाजीगर ते गुंटुर एक्स्प्रेस ४ फेब्रुवारी ते २६ मे दरम्यानच्या ११२ दिवसांपैकी ६५ दिवस अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती जालना स्थानकातून निघेल. तर सायंकाळी सव्वासहा वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकात येणारी काचिगुडा ते नगरसोल एक्स्प्रेसही २६ मे पर्यंत ६५ दिवस दीड तास उशीरा येणार आहे. सेलू ते जालना दरम्यान या एक्स्प्रेसला दीड तास उशीर होणार आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक काळ उशीराने ही गाडी धावणार आहे, ही गाडी उशीराने धावणार असल्याने तिच्यावरील प्रवाश्यांचा ताण रात्री सव्वाआठच्या सुमारास छत्रपत्ती संभाजीनगर स्थानकात येणाऱ्या नांदेड- हडपसर एक्स्प्रेसवर पडणार आहे. १६ डब्यांच्या या गाडीत दहा-अकरा डबे आरक्षित असतात आणि नेहमीच या गाडीत तुडुंब गर्दी असते. त्यामुळे विलंबाने धावणाऱ्या काचिगुडा-नगरसोल गाडीतून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या प्रवाश्यांची मोठी गर्दी पुणे-हडपसर एक्स्प्रेसमध्ये होणार आहे.
ज्यांना छत्रपती संभाजीनगर येथून काचिगुडा गाडीने जायचे त्यांना आता ६५ दिवस जालना स्थानकापर्यन्त जाण्यासाठी दुपारी १-१० वाजता नांदेडकडे निघणारी तपोवन एक्स्प्रेस पकडावी लागेल. नगरसोल एक्स्प्रेसचा पर्यायही जालना स्थानकापर्यंत जाण्यासाठी असेल. परंतु या दोन्हीही गाड्या प्रवाश्यांनी भरलेल्या असतात. २३ डब्यांच्या नरसापूर सुपरफास्ट गाडीचे अठरा डबे आरक्षित असतात.
रेल्वेमार्ग देखभालीसाठी मोठा ‘लाईन ब्लॉक’ घेण्यात येत असल्याने या मार्गावर २७ मेपर्यन्त प्रवाश्यांची मोठी कुचंबणा होणार आहे.

