औरंगाबाद : मराठवाडय़ात दाणादाण उडवून देणारा पाऊस अजूनही काही भागांत सुरू असून बुधवारी सिल्लोड, भोकरदन या दोन तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी झाली. दरम्यान सोमवारी रात्रीपासून सुरू असणारा पाऊस थांबल्यानंतर औरंगाबाद- धुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. आता वाहतूक सुरळीत झाली असली तरी गौताळा अभयारण्यातून जाणारा रस्ता अद्यापि बंद आहे. दरम्यान पाझरतलाव फुटल्याने नुकसान झालेल्या गावात तसेच अतिवृष्टीने जमीन खरवडून गेलेल्या गावात पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हजारो  हेक्टरावरील पिके पाण्याखाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड  व सिल्लोड तालुक्यातील गोलेगाव येथे  अनुक्रमे ७१ व ११४ मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नोंदी आहे. तर  भोकरदन तालुक्यातील भोकरदन, सिपोरा, धावडा या तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली तर  जाफराबादमध्येही ८५ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला.  भोकरदन तालुक्यातील अन्वा मंडळात सर्वाधिक १४१.७५ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. बुधवारी दिवसभरही सरीवर सरी येत होत्या. मराठवाडाभर ढगाळ वातावरण कायम होते.  जायकवाडी, मांजरा आणि माजलगाव येथील धरण पातळीत फारशी वाढ नाही. जायकवाडी ४३ टक्के भरले असून  निम्न दुधना, येलदरी हे प्रकल्प जवळपास भरलेले आहेत. विष्णुपरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. कंधार तालुक्यातील मानार प्रकल्प शंभर टक्के भरला असून त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुखेड तालुक्यालील धामगाव येथील जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी घुसले. उभे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.