मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतर मराठवाडय़ात नांदेड, उस्मानाबादसह काही ठिकाणी गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार बरसात केली. नांदेडमध्ये चार, तर उस्मानाबादेत एका शेतमजूर महिलेचा वीज पडल्याने मृत्यू झाला. दोन्ही ठिकाणी तीन महिलांसह पाच जण जखमी झाले.
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळय़ा घटनांमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू असताना अचानक वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या दोघांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शिवारात दुपारी २ वाजता हा प्रकार घडला. रवि माधव डोपावार व बालाजी सायन्ना करेवार (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. सयाराम दत्तू मलकूवार व साईनाथ माधव डुप्पावार हे दोघे जखमी झाले. मुखेड तालुक्यातील लादगा येथे वीज पडून शाहूबाई विठ्ठल नागरगोजे या तरुणीचा, तर कंधार तालुक्यातील धानोरा येथे लक्ष्मीबाई राजलवाड (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलवाडी, मुखेड व कंधार पोलीस ठाण्यांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्हय़ातील जळकोट (तालुका तुळजापूर) येथे दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून गुराबाई रामा लोखंडे (वय ४०) या शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला जखमी झाल्या. सरूबाई कडपे, सुरेखा रमेश कडपे, देवराबाई राचुटे अशी जखमी महिलांची नावे आहेत. सरूबाई कडपे यांच्या शेतात या सर्व महिला गुरुवारी काम करीत होत्या. पावसाची भुरभुर सुरू असताना अचानक गुराबाई लोखंडे यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ती जागीच ठार झाली, तर अन्य तीन महिला गंभीर जखमी झाल्या. या महिलांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.