नाराज मतदारांच्या ‘व्हिजन’भोवती ‘राज’कारण!

मनसेचे मराठवाडय़ातील अस्तित्व फार तर एखाद्या आंदोलनापुरते.

संग्रहित छायाचित्र

|| सुहास सरदेशमुख

मनसेचे मराठवाडय़ातील अस्तित्व फार तर एखाद्या आंदोलनापुरते. त्यामुळे दखल घ्यावी असा कार्यक्रम म्हणजे राज ठाकरे यांची भाषणे. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी मनसे अध्यक्ष स्वत:च काहीसे सरसावले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दीड महिन्यात औरंगाबाद शहरात दोनदा येत राज ठाकरे यांनी वकील संघाचे प्रतिनिधी, डॉक्टर, औषध विक्रेते, लेखापरीक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पक्षाच्या व्यासपीठावर आणले. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ देणाऱ्या राज ठाकरे यांनी ‘औरंगाबादच्या विकासाचे व्हिजन’ करू असे आश्वासन दिले. नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा औरंगाबादकरांसमोर ठेवला. त्यामुळे शहरातील समस्यांमुळे वैतागलेल्या औरंगाबादकरांना कोणी तरी आपला संताप ऐकणारा आहे, अशी भावना निर्माण झाली. कचरा, पाणी, रस्त्यांवरील खड्डे यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मग समस्यांचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला. सत्ताधारी भाजप-सेनेच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत मनसेची दारे किलकिले झाली आहेत.

औरंगाबादचा विकास व्हावा कसा, या विषयीचा दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून राज ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी विनंती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. तसे ठाकरे यांनीच गुरुवारच्या भाषणादरम्यान सांगितले. कराड यांनी ‘औरंगाबाद व्हिजन’च्या निमित्ताने शहराची अवस्था सांगितली. ते म्हणाले, नाशिकमध्ये रस्ते गुळगुळीत आहेत. पण औरंगाबादमध्ये रस्ते नाहीतच. खड्डेच अधिक आहेत. राज्यात पाण्यासाठी सर्वाधिक कर औरंगाबादमध्ये वसूल होतो. पण पाणी काही दररोज मिळत नाही. समस्या नाहीत, असे कोणतेच क्षेत्र नाही. अगदी डॉक्टरसुद्धा यातून सुटलेले नाहीत. १९८० साली शहराची जी अवस्था होती त्यापेक्षा ती आज खालवलेली आहे. तेव्हाच्या काळी शहर चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. कराड यांनी सांगितलेल्या रडकथेचा पुढचा पाढा मग ड्रगिस्ट व केमिस्ट संघटनेच्या प्रतिनिधींनी पुढे वाचून दाखवला. या संघटनेचे रावसाहेब खेडकर म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. पण एक नागरिक म्हणून आता शहरात राहताना वाईट वाटते. श्वाससुद्धा घेऊ शकत नाही, अशी अवस्था करून ठेवली आहे. गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिग आहेत. पाच दिवसाला एकदा पाणी येते. चीड येते. योग्य ठिकाणी व्यक्तही केली जाते. पण त्याचा फायदा काही होत नाही. आता शहर सोडून जावे की काय, असे वाटू लागले आहे. औरंगाबाद व्हिजनच्या निमित्ताने औरंगाबाद शहरातील सुज्ञ माणूस किती वैतागला हे सर्वाना कळत होते. अशा वातावरणात सत्ताधारी भाजप-सेनेच्या नाराजीच्या या राजकीय पोकळीत मनसे पाऊल पुढे टाकू शकते काय, याची चाचपणी केली जात होती.

इडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. गाडेकर यांनी डॉक्टरांची पिळवणूक कशी होते यावर प्रकाश टाकला. ते सांगत होते, डॉक्टरांना दर तीन वर्षांला भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाते. बॉम्बे नर्सिग होम अ‍ॅक्टमध्ये अशी कोणतीही तरतूद नसताना भोगवाटा प्रमाणपत्र द्यायला सांगायचे. जागा वापरात बदल केल्याचे सांगत अधिक पैसे उकळायचे, अशी जणू महापालिकेची रीत व्हावी, एवढी वाईट परिस्थिती आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या, शहराला आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांची अशी अवस्था केली जात असल्याचे ते सांगत होते. तेव्हा शहरातील एकही घटक महापालिकेच्या कारभारावर खूश नसल्याचे चित्र उभे राहत होते. या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांनी औरंगाबादकरांसाठी नवे व्हिजन देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी राजकीय टोलेबाजी करत विकास कसा करता येईल, याची काही उदाहरणे औरंगाबादकरांसमोर ठेवली.

नाशिकमध्ये केलेले गुळगुळीत रस्ते, वनस्पती उद्यान, पुलाखालची बाग त्यासाठी आणलेला सामाजिक दायित्व निधी यामुळे नाशिकच्या विकासात कशी भर पडली असे सांगताना औरंगाबादच्या विकासासाठी वेरुळ, अजिंठा लेणीचा वारसा हजारो कोटींच्या उलाढालीसाठी वापरता येऊ शकेल, असे सांगितले. नाशिक विकासाच्या संकल्पनासह औरंगाबादला आलेल्या राज ठाकरे यांना हातपाय पसरायला जागा असल्याचे दिसून आली आणि त्यांनी पुढच्या वेळी येताना ‘औरंगाबाद व्हिजन’ मांडू, असे आश्वासन दिले.

औरंगाबाद शहरातील समस्या मांडायच्या त्या माध्यमांमध्ये किंवा समाजमाध्यमांवर हे काम नित्याचे होऊन बसलेल्या औरंगाबाद शहरातील नागरिकांना भाजप-सेनेशिवाय इतर व्यासपीठच नसल्यासारखी परिस्थिती आहे. शहरात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा म्हणावा असा प्रभाव नाही. राष्ट्रवादी तोंडी लावण्यापुरतीही शिल्लक नाही. त्यामुळे प्रश्न मांडायचे कोणासमोर असा प्रश्न निर्माण होत असे. मनसेने ते व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने मनसेचे राजकीय कवाड किलकिले झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मनसेमध्ये काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. काही दिवसांपूर्वी अचल अवस्थेतील मनसेमध्ये आता धावपळ दिसू लागली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raj thackeray in aurangabad

ताज्या बातम्या