लोकसत्ता प्रतिनिधी – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विभागाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या करून “दृश्यम” चित्रपटात तपास भलत्याच दिशेने भरकटवण्यासाठी मोबाईल फोन दुसऱ्याच शहरात फेकून तिसरीकडे प्रवास करणाऱ्या या प्रकरणातील चौथ्या आरोपीला शनिवारी रात्री अखेर पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ही माहिती दिली.
दृश्यम चित्रपटातील घटनाक्रमाची कॉपी करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०) यांचा मृतदेह पुरून ठेवल्याचा प्रकार सव्वा महिन्यानंतर उघडकीय आला आहे. यातील तीन आरोपींना निष्पन्न करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यातील चौथा आरोपी अक्षय बाळकृष्ण शेटे (वय २४) याचा पोलिसांना शोध होता. शेटेने पोलिसांचा तपास भरकटावा यासाठी पुणे गाठले. तेथे मोबाईल फोन फेकून दिला. शेटे याने शनिवारी छत्रपती संभाजीनगर गाठले. तो क्रांती चौकात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जाळे टाकून त्याला अटक केली. आर्थिक देवाण-घेवाण व्यवहारातून राजाभाऊ लोंढे यांचा खून केल्याची कबुली यापूर्वी पकडलेल्या आरोपींनी दिली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मागील रविवारी रात्री दिली होती.
विशाल विकास राठोड (वय २४ रा. गेवराई तांडा, छत्रपती संभाजीनगर), आकाश विनोद पवार (२४, रा. गेवराई तांडा), करण विलास आडे २२, रा. गिरनेर तांडा), अशी यापूर्वी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व नोंद आहे. उस्मानपुरा ठाण्यात ५ फेब्रुवारी रोजी ज्योतीनगर येथील अभिरीका अपार्टमेंट मध्ये राहणारे राजाभाऊ सुभराव लोंढे हे हरवल्याची तक्रार त्यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी ६ फेब्रुवारीला केली होती. राजाभाऊ लोंढे हे शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झाले होते. तपासात खुनाच्या घटनेदिवशी (५ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास भाऊसाहेब लोंढे व त्यांचा मित्र विशाल राठोड, आकाश पवार, दोन महिलांसह दौलताबाद येथील चौधरी फार्महाउस येथे गेले होते असे आढळून आले.
पार्टी झाल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पहाटे विशाल राठोड त्याचा मेहुणा आकाश व भाऊसाहेब लोंढे असे तिघे जण विशाल राठोड याच्या क्रेटा गाडीमध्ये शहरामध्ये आले. लोंढेम यांना सिग्मा हॉस्पीटल जवळ सोडल्याचे विशाल राठोड सांगत होता. परंतु राजाभाऊ लोंढे यांचा ठावठिकाणा मिळुन आला नाही. एक महिना उलटून देखील काहिएक उपयुक्त माहितो मिळत नसल्याने राजाभाउ लोंढे यांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना १२ मार्च रोजी भाऊसाहेबांचा पत्ता लागत नसल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांनी तातडीने चौकशी अधिका-यांकडून माहिती घेऊन तपासाच्या सूचना केल्या. यामागे घातपाताची शक्यता वाटल्याने पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक गजानन कल्यानकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले.
त्यानंतर विशाल राठोड व आकाश पवार यांचे सखोल जबाव घेतले. त्याच बरोबर तांत्रीक विश्लेषण आणि सीसीटिव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. दोन्ही आरोपींच्या जबाबामध्ये बरीच तफावत दिसून आली. यातून लोंढे यांचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी विशालकडून कबुली
आरोपी क्रं. १ विशाल राठोडने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की,माझे व माझ्या ओळखीचे राजाभाऊ लोंढे यांच्याशी मागिल काही दिवसांपासुन आर्थिक देवाणघेवाणी व्यवहारारुन वाद चालू होते. ५ फेब्रुवारी रोजी दौलताबाद येथील फार्महाउसच्या पार्टी मध्ये मिळाली. त्या दिवशी मी आणि माझा दाजी आकाश पवार यांनी मिळून लोंढे सरांना खूप जास्त दारु पाजली. त्यांना कसलिही शुद्ध नव्हती. त्याचा फायदा घेवून मी शहराकडे परत येताना रेल्वे पुलाजवळ, साजापुर शिवारात थांबून माझ्याकडे असलेल्या पिस्टलने लोंढे सरांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना जिवे ठार मारले असे विशालने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दृश्यम स्टाईल विल्हेवाट
राजाभाऊ लोंढे यांचे प्रेत गेवराई तांड्याच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये पूर्वीच खोदून ठेवलेल्या एका खड्यामध्ये टाकुन त्यावर जेसीबीने माती टाकल्याचे निष्पन्न झाले. १५ मार्च रोजी जवळपास ४० दिवसांपासून खड्ड्यांमध्ये पुरलेले लोंढे यांचे प्रेत कायदेशीर प्रक्रिया राबवून बाहेर काढले आहे. मोबाईलवरूनही काही सुगावा लागू नये म्हणून अक्षय शेटेने फोन पुण्यात फेकला.
