छत्रपती संभाजीनगर : महापालिकेमध्ये ५६ जागा मिळवून बहुमताला एक नगरसेवक कमी असतानाही भाजपने शिवसेनेला युतीत सामावून घेतले. विशेष म्हणजे उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचे नाव शिवसेनेकडून देण्यात आले. असे करताना पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रक्रियेपासून चार हात लांबच ठेवण्यात आल्याचे दिसून आले. जंजाळ यांचे नाव जाहीर करताना मुंबईहून आलेले प्रभारी विलास पारकर यांची हजेरी होती.
उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि महापौरपदी समीर राजूकर यांची नावे जाहीर करताना पालकमंत्री संजय शिरसाट हे अनुपस्थित होते. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार बैठकीमध्ये जाहीर केले. महापालकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला केवळ १३ जागा मिळाल्या. शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी हे मात्र निवडून आले.
सत्तेमध्ये भाजपने शिवसेनेला बरोबर घेत सत्तेत वाटा देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नेत्यांबरोबर शुक्रवारी तातडीच्या चर्चा करण्यात आल्या. राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपदी नेमण्याबाबतची माहिती आपणास देण्यात आली होती. पण सर्व ठिकाणी मी जाणे शक्य नसते. मला जिल्हा परिषदेची कामे सुरू होती. त्यामुळे नावे घोषित करताना मी पत्रकार बैठकीस उपस्थित नव्हतो, असे संजय शिरसाट म्हणााले.
जंजाळ यांच्या नावाची शिफारस असणारे पत्र मुंबईहून आलेल्या विलास पारकर यांनी भाजप नेत्यांना दिले. मुंबईहून एकनाथ शिंदे यांनी हे नाव नक्की केल्याचेही पारकर यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले. दरम्यान, उपमहापौर पदाची निवड ही पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पंख छाटण्याचा प्रकार असल्याची चर्चा आता राजकीय वतुर्ळात सुरू झाली आहे. शिरसाट यांनी मात्र या निवड प्रक्रियेची माहिती आपणास दिली होती, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

