परभणी : सध्याचे सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट आहे. या सत्तेत ठग, पेंढारी बसलेले आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन दिली जाणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.

परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे रविवारी (दि.१६) शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने एल्गार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून झाले. यावेळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत आसूड उगारण्यात आला. एल्गार परिषदेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,माजी खासदार तुकाराम रेंगे,माजी आमदार विजय गव्हाणे, किसान सभचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर,काॅ. गिरीष फोंडे, काॅ. अजय बुरांडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  किशोर ढगे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या काॅ. माधुरी क्षीरसागर, सोनाली देशमुख, माजी आमदार व्यंकटराव कदम, नागोराव पांचाळ, शिवलिंग बोधने,गोविंद घाटोळ, ओंकार पवार आदि यावेळी उपस्थित होते.

माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करून यांना सत्तेचा अहंकार आला आहे असे सांगत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ठराव घ्यावेत असे आवाहन केले. अखिल भारतीय किसान सभेचे राजन क्षीरसागर यांनी एकीकडे सरकारच्या तिजोरी ठणठणात आहे पण शक्तिपीठ महामार्गावर एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. शेतकरी सरकारच्या विरोधात ठामपणे उभे असून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.

कॉ. अजय बुरांडे म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तिपीठची गरज नसून सिंचनाची गरज आहे. फोंडे म्हणाले, ही लढाई शेतकऱ्यांच्या बांधावरील असून ती शेतकरीच जिंकणार आहेत. माजी खासदार रेंगे यांनी शक्तिपीठ या महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांवर हा महामार्ग लादला जात असल्याचे सांगितले. माजी आमदार विजय गव्हाणे यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करत या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप केला. यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. परिषदेचे सुत्र संचालन काॅ ओंकार पवार यांनी केले. यावेळी परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.