दुष्काळी जालना जिल्ह्य़ातील शेतकरी तसेच अन्य जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (१५ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. जिल्हा व तालुका पातळीवर बैठका घेऊन शिवसेनेने या मोर्चाची पूर्वतयारी केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले की, पिण्याचे पाणी तसेच रोजगार हमीची कामे, खरीप अनुदानातून कापूस पिकास वगळणे, पीक विम्याचे वितरण, विजेचे प्रश्न इत्यादी प्रश्नांकडे या मोर्चाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले जाणार आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस झाला नाही. जो पाऊस झाला तो लहरी आणि मोठे खंड देणारा होता. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला. बदनापूर, जालना, जाफराबाद, परतूर व मंठा या तालुक्यात खरिपाची पेरणी उद्दिष्टांपेक्षा कमी झाली. खरिपाने निराशा केली आणि रब्बीमध्ये जिल्ह्य़ात अपेक्षित सरासरीएवढी पेरणी झाली नाही. अपेक्षित उत्पादन नाही आणि आलेल्या उत्पादनास योग्य बाजारभाव मिळाला नाही म्हणून जिल्ह्य़ातील शेतकरी अडचणीत आला असून फळबागाही पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत.
भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने विंधन विहिरी आणि विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढत चालली आहे. सध्याच जिल्ह्य़ातील जवळपास दीडशे गावे आणि वाडय़ा टँकरवर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असून ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.