परभणी: मराठा आरक्षणाचे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात अभूतपूर्व जागृती केली असून गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे मात्र सरसकट मराठा आरक्षण देऊ नये, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. पूर्णा तालुक्यातील गौर येथील सावळे कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी ते परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. पूर्णा तालुक्यातील गौर येथील तरुण संतोष सावळे हत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी, यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, राज्यसचिव डी. एन. दाभाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, ज्येष्ठ नेत्या राणूबाई वायवळ तसेच परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मयत संतोष सावळे राजकीय पार्श्वभूमीचा तरुण होता. या हत्याकांड प्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणात अजून सात – आठ आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीमार्फत सखोल तपास होहून सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे. दरम्यान, परभणी शहरातील संविधान उद्देशिका विटंबना प्रकरणातील तरुणांवरील पोलीस प्रकरणे मागे घेण्याचे आवाहन त्यांनी त्यावेळी राज्य सरकारला केले. यापूर्वी राज्य सरकारने नामांतर लढा, मराठा आरक्षण व मंडळ आयोग आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याचेही त्यावेळी आठवले यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा फायदा खुल्या प्रवर्गातील मर्यादित उत्पन्न असलेल्या नागरिकांना होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके हा बुद्धिमान तरुण असून त्याने योग्य प्रश्नावर आवाज उठविला आहे. सीजेपीने मागणी केलेल्या मंत्र्याची केंद्र सरकारने हकालपट्टी केली असल्याने या आंदोलनाला यश आल्याचेही यावेळी आठवले म्हणाले.
९०च्या दशकात रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटातील नेत्यांनी योग्य भूमिका निभावली असती तर २० पेक्षा अधिक आमदार निवडून आले असते असे सांगून सर्व आंबेडकरी पक्षांचे ऐक्य व्हावे, ही आपली भूमिका असून रिपब्लिकन पक्ष हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
