परभणी : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये एनडीए आघाडीच्या वतीने आपली राज्यसभेची जागा निश्चित आहे. मात्र येत्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा लढायला आवडेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावली विश्रामगृहावर आयोजित पत्रकार बैठकीत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पक्षाचे डी. एन. दाभाडे, राणूबाई वायवळ, डॉ. सिद्धार्थ भालेराव आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असून पक्षाच्या वतीने मी केंद्रात मंत्री आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपणास यापूर्वी दोनदा राज्यसभेवर पाठवले असून तिसऱ्यांदा देखील आपणास राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित आहे. याचबरोबर राज्यात चार जागांवर भारतीय जनता पक्षाचे, एका जागेवर शिवसेनेचे आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तेवढे महायुती म्हणून संख्याबळ आहे. मात्र सातव्या जागेवरही महायुतीचा उमेदवार दिल्या जाऊ शकतो, त्यासाठी सर्व ताकद लावून उमेदवार निवडून आणण्याची तजवीज करण्यात येईल, असेही राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावे, इतर कुठल्याही धर्मीयांच्या विश्वस्त मंडळात बौद्ध धर्मियांचा समावेश नाही. मग महाबोधी महाविहार विश्वस्त मंडळात इतर धर्मियांचा समावेश का ? असा सवाल यावेळी आठवले यांनी केला. तसेच राज्यात प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते असून एकीकरणासंदर्भात आपण वेळोवेळी भूमिका घेतल्याचे आठवले यांनी सांगितले.

भारत अमेरिका यांच्यात जो करार झाला त्यामुळे शेती, रोजगार, उद्योग यांना चालना मिळेल. भारत हा जगातल्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून येणाऱ्या काळात तो आणखी वरच्या स्थानी असेल. काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम चालवले आहे. केंद्र सरकारच्या वतीने अनेक योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील गरिबी दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत असेही ते म्हणाले.