जालना : निवडणूक संपली की मतभेद संपले पाहिजेत. आगामी काळात जालना शहराचा सर्वांगीण विकास आमदार अर्जुनराव खोतकर यांना सोबत घेत महायुतीच्या माध्यमातूनच करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिली. तर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, आमच्यात कधीच मनभेद नव्हते. किरकोळ मतभेदही दूर झाले असून दोघेही एकत्र येत शहराचा विकास साधू.

आमदार खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बालाजी चौक ते राजूर चौफुली (ढवळेश्वर मार्गे) या सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार खोतकर होते. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, जालना शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. सोलापूर, जळगाव, संभाजीनगर, नागपूर, देऊळगावराजा अशा शहराच्या चहूबाजूने महामार्ग झाले आहेत. जालन्याचा संपर्क चहूबाजूने वाढला आहे. राजूर ते भोकरदन आणि विशाल कॉर्नर ते बसस्थानक या रस्त्याचे चार पदरी काम होणे आवश्यक आहे. यासंदर्भात प्रस्ताव दाखल करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित कार्यकारी अभियंत्यांना केली. तुम्ही प्रस्ताव दाखल करा मी आणि खोतकर मिळून मंजुरी आणू ,असे त्यांनी सांगितले.

जालना शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी आणि खोतकर महायुती म्हणूनच काम करणार आहोत. उपस्थित महापौर, उपमहापौर आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांना निधी वाटप करताना सर्व प्रभागांना समान निधी द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, ढवळेश्वरचा रस्ता झाला म्हणजे जालना ते भोकरदन जाणे-येणे सोपे होईल. जालना आणि भोकरदनच्या मध्ये राजूर आहे. एकदा गणपतीसमोर एकीची आरती करू!

खोतकर म्हणाले, बालाजी चौक ते ढवळेश्वर मार्गे राजूर चौफुलीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले होते. लोकांची तीव्र मागणी लक्षात घेऊन आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरला भेट घेतली. त्यांनी या कामास मंजुरी देऊन १५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. भोकरदनकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या कामामुळे आपला आणि रावसाहेब दानवेंचा एकमेकांकडे जाणारा रस्ताही मोकळा झाल्याची टिप्पणी खोतकर यांनी केली.

राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे मी आणि दानवे मिळून जालना शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहोत. जलशुद्धीकरण प्रकल्प असो की सौरऊर्जा प्रकल्प, शहरातील कोणत्याही विकासकामांसाठी मी आमदार म्हणून महापौरांना सहकार्य करणार आहे. महापौरांनी विकासकामांचे प्रस्ताव दिल्यास नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू असेही खोतकर म्हणाले.

माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर म्हणाले की, दानवे आणि खोतकर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्ष एकत्रित काम करीत आहेत. त्यांच्यात मतभेद झाले की कार्यकर्त्यांची अडचण होते. परंतु शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन नेत्यांनी एकत्र राहिले पाहिजेमहापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, मनसेतील विरोधी पक्ष नेते कमलेश खरे आदींची उपस्थिती या वेळी होती.