छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील रेल्वे मार्गासाठी १४ हजार २०६ कोटींची तरतूद केल्याची माहिती देऊन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या विभागातील खासदारांवर कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे.

देशाच्या १ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यास रेल्वे प्रश्नावर काय पदरात पडले, अशी चर्चा सुरू असताना आणि काही खासदार केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदने दिल्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर फिरवत असताना बुधवारी भाजप नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये मराठवाड्यातील रेल्वे मार्गासाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदी राहिलेल्या दानवे यांनी मराठवाड्यासाठी काय मिळाले, याची कुठलेही पद नसताना माहिती मिळवून सांगण्यामागे महाविकास आघाडीच्या खासदारांवर केलेली एकप्रकारची कुरघोडी असल्याचे मानले जात आहे. त्यातही दानवे यांनी त्यांचा पराभव केलेले जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्यावर टीका करताना समृद्धी महामार्गाजवळून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती (हायस्पीड) रेल्वेसाठी डाॅ. काळे यांनी पाठपुरावा केला नाही, असा आरोप केला.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे परळी-बीड-अहिल्यानगर रेल्वेचे काम गतीने व्हावे, या प्रश्नावर श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करताना केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या दिल्लीमध्ये घेतलेल्या भेटींची छायाचित्रे समाजमाध्यमांत प्रसारित करतात. परंतु नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात परळी-बीड-अहिल्यानगर या रेल्वेमार्गासाठी किती तरतूद झाली, याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून पुढे यायच्या आधीच माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी ४ हजार ९५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे बुधवारी सांगितले. तसेच नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गासाठी ३ हजार ४४५ कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याची माहितीही दानवे यांनी दिली असून, केंद्राच्या सीईआर या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधून भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे) छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावरही कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. रावसाहेब दानवे हे भाजपकडून लोकसभेवर सलग पाचवेळा निवडून गेले असून, त्यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. खासदार भुमरे हे पैठण तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. तर काँग्रेसचे खासदार डाॅ. काळे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पिसादेवीचे रहिवासी आहेत.

रावसाहेब दानवे यांनी जालना ते जळगाव या नवीन रेल्वेमार्गासाठी ५ हजार ८०४ कोटी रुपये मंजूर करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही सांगितले आहे.

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून २०२४ च्या निवडणुकीत महायुतीचा संदिपान भुमरे यांच्या रुपाने केवळ एकच खासदार निवडून आला असून, उर्वरीत सात खासदार हे महाविकास आघाडीचे आले आहेत. त्यात जालन्यातून काँग्रेसचे डाॅ. कल्याण काळे, परभणीतून शिवसेनेचे (उबाठा) संजय जाधव, हिंगोलीतून शिवसेनेचे (उबाठा) नागेश आष्टीकर, नांदेडमधून काँग्रेसचे प्रा. रवींद्र चव्हाण, लातूरमधून काँग्रेसचे डाॅ. शिवाजी काळगे, धाराशिवमधून शिवसेनेचे (उबाठा) ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) बजरंग सोनवणे यांचा समावेश आहे.