पारदर्शकतेसाठी प्राध्यापकांची भरती ऑनलाइन

राज्याने अलिकडेच अत्यावश्यक सेवेतीलच भरती केली जाणार असून अन्य विभागातील जागांच्या संदर्भाने निर्णय घ्यावयाचा असेल

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

औरंगाबाद : राज्यातील महाविद्यालयांमध्ये करण्यात येणाऱ्या प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी ऑनलाइनची पद्धत अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी येथे दिली.

मागील आठवडय़ात मंत्री सामंत यांनी लवकरच राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केली होती. त्यानंतर प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भाने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यात भरती प्रक्रियेत पारदर्शकता कशी राहील, असा प्रमुख प्रश्न होता. त्या संदर्भात पत्रकार बैठकीत विचारले असता सामंत यांनी प्राध्यापकांची भरती लॉनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला प्रश्न व विद्यापीठ अनुदान आयोगाचे भरती संदर्भातील निकषाच्या मुद्दय़ाला सामंत यांनी बगल दिली.

राज्याने अलिकडेच अत्यावश्यक सेवेतीलच भरती केली जाणार असून अन्य विभागातील जागांच्या संदर्भाने निर्णय घ्यावयाचा असेल, तर वित्त विभागाची परवानगी आवश्यक असल्याचा अध्यादेश काढला आहे. या कडे लक्ष वेधल्यानंतर सामंत यांनी प्राध्यापक भरती संदर्भातील फाइल उच्च व तंत्रविभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आली असून तेथून ती वित्त विभागाकडे मंजुरीसाठी जाणार असल्याचे स्पष्ट केले.

संतपीठाचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये

संतपीठाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी १ कोटी रुपये दिलेले आहेत. आता ५० लाखांची तरतूद विद्यापीठाकडून तर ५० लाख महाराष्ट्र शासन देणार आहे. संत एकनाथ महाराज संतपीठ येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होईल. वसतिगृहही सुरू करण्यात येईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले. राज्याचा मंत्री असलो तरी आपण शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता असून पक्षाच्या वतीने मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्य़ांमध्ये मिळून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८३ कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.

‘बाटू’चे विभागीय कार्यालय औरंगाबादेत

कोकणातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटूू) विभागीय कार्यालय (उपकेंद्र) औरंगाबादेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विविध शाखांसाठी ६६० जागा असून येथे आता ३० जागांचा आर्टिफिशिअल इंटिलिजन्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Recruitment professors online transparency ssh

ताज्या बातम्या