दुष्काळामुळे बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले असताना एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली असून, बीड विभागाने महिनाभरात १६ कोटी ४८ लाखांचा गल्ला जमवला. दिवाळीच्या काळात एसटी बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत प्रवासीसंख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली. पंढरपूर, कपिलधार येथील यात्राही एसटीसाठी लाखमोलाच्या ठरल्या.
जिल्ह्यात दुष्काळी स्थितीने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत असले तरी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मात्र यंदा घसघशीत वाढ झाल्याने दिवाळीच्या हंगामात एसटीने कोटींची उड्डाणे घेतली. विभागातील आठ आगारांमधून लांब पल्ल्यासाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यातून ३३ लाखांचे उत्पन्न मिळाले. नियमित बससेवेलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने २० दिवसांसाठी झालेल्या हंगामी दरवाढीचा फारसा परिणाम प्रवासीसेवेवर झाला नाही. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत १६ कोटी ४८ लाख ५६ हजारांचे उत्पन्न मिळाले. गर्दीच्या हंगामात खासगी बसेसने दुप्पट-तिप्पट भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली. या बरोबरच ६ वर्षांपासूनच्या मागणीला याच वर्षी यश आल्याने बीड-पुणे, मुंबई आणि माजलगाव-मुंबई या दोन हिरकणी बससेवेला सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये सर्वच बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी होती. वीस दिवसांत एसटीचे उत्पन्नही वाढले. नोव्हेंबरचा महिना हा गर्दीचा हंगाम ठरला. २० ते २६ नोव्हेंबर पंढरपूर आणि २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत कपिलधार यात्रेतून २४ लाखांचे उत्पन्न मिळाले. बीड विभागासाठी यंदाची दिवाळी कोटींचे उड्डाणे घेणारी ठरली. अधिकारी, चालक, वाहक यांच्या प्रयत्नामुळे प्रवाशांना चांगली सुविधा दिल्यामुळे मोठे उत्पन्न मिळाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी यू. बी. वावरे यांनी सांगितले.
आळंदी, लोणीसाठी ११५ जादा बसेस
बीड विभागातून विविध यात्रांसाठी प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी जादा बसेसचे नियोजन केले जाते. पंढरपूर, कपिलधार येथील यात्रांनंतर आळंदीसाठी १० डिसेंबपर्यंत ८८, तर लोणी (तालुका रिसोड)साठी १० ते १२ डिसेंबपर्यंत २७ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. माजलगाव व अंबाजोगाई आगारांतून सर्वाधिक ४० बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक पी. बी. नाईक यांनी दिली.