राज्यातील मोठय़ा शहरांसाठी अतिरिक्त तहसील आणि ग्रामीण भागासाठी वेगळे तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय तत्त्वत: घेण्यात आला असून, नवीन तहसील निर्मितीसाठी चाचपणी सुरू केली असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे बोलताना सांगितले.
येथील नवीन तहसील कार्यालय सोमवारी कार्यान्वित झाले असले, तरी त्याचे उद्घाटन मात्र रखडले आहे. केवळ निमंत्रणपत्रिकेचे कारण देत हे उद्घाटन लांबविण्यात आले. ते लवकरच करू, एवढेच खडसे यांनी सांगितले. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरी भागात कामाचा ताण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी अशी दोन स्वतंत्र कार्यालये असावीत, असा निर्णय तत्त्वत: मान्य केला असून लवकरच तहसील विभाजनाचा निर्णयही घेण्यात येणार आहे.
नवीन तहसीलमध्ये समाविष्ट होणारा शहरी व ग्रामीण भाग याचे स्वतंत्र नकाशे केले जात असून, शहरी भागातील कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नियुक्तीही केली जाणार आहे. महापालिकेकडील ऐतिहासिक तीन गेटच्या पूल उभारणीच्या कामासाठी १० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जाईल. यासाठी पर्यटन आणि महापालिकेलाही विश्वासात घेऊ, असेही ते म्हणाले.