छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय तंत्रनिकेतनकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीला एका रिक्षाचालकाने अश्लील हावभाव करून त्रास दिल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी स्टेशन रोडवर घडला. विशेष म्हणजे पीडित विद्यार्थिनीने त्या रिक्षातून शिक्षण संस्थेपर्यंत प्रवास केला होता. रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने अश्लील हावभाव केला, असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, असे वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पीडित विद्यार्थिनी १७ वर्षांची असून ती वाळूज येथील रहिवासी आहे. घरापासून ती बाबा पेट्रोल पंपापर्यंत गेल्यानंतर महावीर पोलीस चौकीपासून शासकीय तंत्रनिकेतनकडे संबंधित रिक्षातून दुपारी निघाली होती.

हेही वाचा…‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यातून बँकांची वसुली; नियमानुसार शिल्लक न ठेवल्यामुळे रक्कमेत कपात झाल्याच्या तक्रारी

शहरामध्ये यापूर्वी खासगी शिकवणीला जाणाऱ्या मुलींना रिक्षा चालकांकडून छेडछाड करून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित प्रकार लक्षात येताच विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारली होती. यापूर्वी एक घटना आकाशवाणी परिसरात तर एक शिल्लेखाना परिसराच्या आसपास घडली आहे.

हेही वाचा…कारण राजकारण: संभाजी निलंगेकरांना घेरण्याची देशमुख यांची व्यूहरचना, विजय खडतरच…

पोलिसांकडून संबंधित रिक्षा चालकाची परेड घेण्यात आली. मात्र परेडच्या वेळी अश्लिल हावभाव करणारा चालक नसल्याचे पीडितेने सांगितले, असे पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी माहिती दिली.