छत्रपती संभाजीनगर : राजा शिवाजी चित्रपटाच्या निर्मितीनंतर या चित्रपटाच्या यशासाठी आणि कुलधर्म – कुलाचार म्हणून शुक्रवारी रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जनेलिया यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. या चित्रपट प्रदर्शनापूर्वी गेले काही दिवस न झोपलेल्या रितेश देशमुख यांनी तुळजाभवानीचे चरण जवळ केले. त्याचे वडील दिवंगत नेते विलासराव देशमुखही आवर्जून तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येत.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.

तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याची कथा सर्वत्र सांगितली जाते. इतिहासाच्या पानात शिवाजी महाराजही मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येत असल्याचे उल्लेख करण्यात आलेले आहेत. दुर्गट दूर करणारी अधिष्ठात्री देवता म्हणून गावोगावची भक्तमंडळी तुळजापूर नगरीमध्ये येत असतात. शुक्रवारी रितेश देशमुख आणि कुटुंबीय देवी चरणी आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कुलधर्म – कुलाचाराच्या पूजाही रितेश देशमुख यांनी केल्या.