औरंगाबमधील आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. या प्रकरणात बाळासाहेब थोरात, संजय हरणे यांच्यासह शिवसेनेच्या २५ ते ३० कार्यकर्तांविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशवाणी चौकालगतच्या आकाश इन्स्टिट्यूट या कोचिंग क्लासेसचा व्यवस्थापक शिवहरी वाघ आणि कर्मचारी रोहित सूळ हे शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थीनींशी अश्लील वर्तन करत असल्याची तक्रारीनंतर पालकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती.

त्यानंतर गुरुवारी दुपारी औरंगाबाद शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आणि अन्य कार्यकर्त्यांनी दोन्ही आरोपींना क्लासमध्ये घुसून बेदम चोप दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यात तेथील सामानाचे नुकसान झाले होते. या प्रकरणी संस्थेचे सहसंचालक मंगेश आस्वर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यांच्या फिर्यादी वरून २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप शिवसेनेच्या कोणात्याही पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही.