छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर निर्माण झालेला रोष एकत्रित करण्यासाठी आमदार रोहित पवार छत्रपती संभाजी नगर शहरात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला नीट विरोधातील पेपर फुटीचे कारण जोडलेले असल्याने अभिजीत दिपके हेही या आंदोलनात सहभागी होणार आहे. तसे त्यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून जाहीर केले आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या विरोधातील आंदोलन केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शिक्षक पात्रता पेपर फुटीच्या विरोधात ही आंदोलन करू असे जाहीर केले होते. आंदोलनाची मोठी तयारी करण्यात आली असून परीक्षांमध्ये होणारे वेगवेगळे घोटाळे, नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा न लागणारे निकाल, त्यातील घोळ याविरुद्ध निर्माण होणारा रोष एकवटावा असे प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडून सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली होती.
यामुळे या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग असेल असा दावा केला जात आहे. लातूरमध्ये ‘ नीट ’ चे पेपर फुटल्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरमध्ये सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत. अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या ‘ कॉक्रोच जनता पार्टी ’चे हैदराबाद आणि पुणे येथेही आंदोलन झाले. मात्र, मराठवाड्यात या प्रश्नावर मोठे आंदोलन झाले नव्हते.
रोहित पवार यांनी या प्रश्नाला हात घातल्यानंतर अभिजीत दिपके हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिक्षक, स्पर्धा परीक्षा करणारे तरुण या आंदोलनात सहभागी होणार आहेत. लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे शिक्षणाच्या कंपनीकरणावर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाने यात पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. शेती आणि तरुणांच्या प्रश्नावर मराठवाड्यातून आंदोलनास सुरुवात झाली आहे.
