मुख्य सचिवांकडून पाहणी

अजिंठा लेणीच्या खडय़ा पायऱ्या टाळण्यासाठी रोप वे किंवा सरकता जिना तयार करण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी या अनुषंगाने कोणता पर्याय योग्य राहू शकतो, याचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यटनवाढीसाठी हेलिकॉप्टर वाहतुकीच्या पर्यायावरही अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी आलेल्या मुख्य सचिवांनी नुकतीच अजिंठा लेणीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान अजिंठय़ाच्या खडय़ा पायऱ्या टाळून वर जाण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात, याचा अभ्यास करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांना दिल्या.

औरंगाबाद येथे येणारे पर्यटक मोठय़ा संख्येने वेरुळ लेणीला भेट देतात, मात्र अजिंठा लेणीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी घटते आहे. औरंगाबादहून अजिंठा येथे बसने जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. एवढा प्रवास केल्यानंतर लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला चढणीच्या पायऱ्यावरून जावे लागते. वयोवृद्धांना तसेच गरोदर महिलांना त्यामुळे अजिंठा पाहणे अवघड होऊन बसते. त्यामुळे या पायऱ्या टाळता येऊ शकतात काय, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी पांडेय या खडय़ा पायऱ्यांसह लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना कोणत्या सुविधा द्यायच्या, याचा अहवाल पर्यटन सचिवांकडे पाठवणार आहेत.

माहितीचे फलक लागणार

औरंगाबाद येथे पर्यटक उतरल्यानंतर त्याला कोणते पर्यटनस्थळ किती अंतरावर आहे, तेथे जाण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती दर्शवणारे फलक लावण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाला देण्यात आल्या आहेत. विमानतळ व रेल्वेस्थानकावर पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र काऊंटर उघडण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला असून, असे केंद्र लवकरच सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

 हेलिकॉप्टरच्या सेवेसाठी पुन्हा जोरबैठका

औरंगाबादहून अजिंठा येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी सुरू असणारी प्रक्रिया थांबली होती. येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला राज्यस्तरावरून गती दिली जाणार आहे. काही भागातून हवाई वाहतूक करण्यास परवानगी नाही. तसेच काही संरक्षणाच्या अंगाने प्रश्न असल्याने त्यावर चर्चा होत असून लवकरच निर्णय घेतले जातील, असे सांगितले जात आहे.

गाइडसाठी प्रशिक्षण होणार

गेल्या कित्येक वर्षांपासून गाइड तयार करण्याची प्रक्रिया बंद आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून पूर्वी प्रशिक्षण दिले जायचे, ते बंद आहे. त्यामुळे नव्याने गाइड तयार करून फर्दापूर, सोयगाव भागांतील नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्किल इंडियातून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी सांगितले.