scorecardresearch

गुलाबाचा व्यवसाय बहरला

करोनाच्या दोन वर्षांपूर्वीपासूनच्या निर्बंधांमुळे धरलेली काजळी यंदाच्या व्हॅलेंटाईन दिनी गळून पडल्याचे चित्र फुलांच्या बाजारपेठेत सोमवारी होते.

शेतात गुलाबतोड करताना मनोज गाजरे.

औरंगाबाद : करोनाच्या दोन वर्षांपूर्वीपासूनच्या निर्बंधांमुळे धरलेली काजळी यंदाच्या व्हॅलेंटाईन दिनी गळून पडल्याचे चित्र फुलांच्या बाजारपेठेत सोमवारी होते. विशेषत: गुलाब विक्रीचा व्यवसाय चांगलाच बहरलेला दिसून आला. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खरेदीचा उत्साह होता. २५ ते ५० रुपयांपर्यंत एका गुलाबाची खरेदी-विक्री झाली. उत्पादक शेतकऱ्यांनीही व्हॅलेंटाईन दिनी मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद गाठून ठोक बाजारपेठेसह स्वत: फुलं विक्री केल्याने त्यांना दिवसभरात १५ ते २० हजारांच्या कमाईचा हात मिळाला.

औरंगाबादेतील जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह सिटी चौक परिसरात फुलांचा ठोक विक्री बाजार भरतो. व्हॅलेंटाईन डे या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसानिमित्त तरुणाईकडून गुलाब पुष्पाला मागणी असते. बाजार समितीतील फुलांचे व्यापारी समाधान विखे यांच्या माहितीनुसार सोमवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाब फुलांना मागणी अधिक होती. एक फूट लांब दांडी असलेल्या डच फुलांची २० नगाची गड्डी १८० ते २०० रुपयांना विक्री झाली. गावरान सीडी गुलाबाची एक गड्डी तीस ते चाळीस रुपयांना खरेदी झाली. डच गुलाबाची २० नगाच्या ३०० ते ४००, तर गावरान गुलाबाच्या ७०० ते ८०० गड्डींची विक्री झाली. मात्र फूलबाजारात सोमवारी केवळ गुलाबांनाच उठाव मिळाला. इतर फुलांना अपेक्षित उठाव मिळालाच नाही, असे समाधान विखे यांनी सांगितले.

पैठण तालुक्यातील विहामांडवाजवळील वडजी येथील फूल उत्पादक मनोज गाजरे यांनी मात्र, उत्साहात व्हॅलेंटाईन डे पावल्याचे सांगितले. गोजरे यांची एक एकरवर फुलांची शेती आहे. गतवर्षी याच दिवसांचा काळ करोना निर्बंधांचा राहिला होता. परिणामी फुलांना अपेक्षित उठाव मिळाला नाही. फुलांची शेती साधारणपणे महिन्याला सर्व खर्च जाता ७० ते ८० हजार रुपये देऊन जाते. या महिन्यातही लग्नसराईमुळे आणि निर्बंध शिथिल झाल्यामुळे फुलांना चांगली मागणी असून व्हॅलेंटाईन दिनी २० हजार रुपयांची सीडी या गावरान प्रकारातील गुलाब फुले विक्रीतून झाली. १० रुपयांना सुरुवातीला एक गुलाब तर नंतर तो घसरत ३ रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे गोजरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rose business flourished after corona restrictions ysh

ताज्या बातम्या