राहाता: कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून अहिल्‍यानगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी ९० हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आल्याने गोदावरी धरण समूहात अधिकचे पाणी निर्माण होणार आहे. गोदावरी कालव्याच्या शंभर वर्षांच्या इतिहसात प्रथमच नूतनीकरण व सक्षमी करणासाठी ४०० कोटींचा भरीव निधी उपलब्ध करण्यात आला तसेच पुणतांबा येथील जुन्या ‘केटी वेअर’चे आधुनिक ‘व्हर्टिकल बॅरेज’मध्ये रूपांतरासही विभागाने मान्यता दिल्याने २० टक्के पाणीसाठ्यात वाढ होईल. या कामास निधीची उपलब्धता करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

तालुक्यातील पुणतांबा येथे सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज, बुधवारी विखे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना विखे यांनी सांगितले की, कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी ९० हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. यातून ८५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातील ५५ टीएमसी जायकवाडी, १५ ते २० टीएमसी भंडारदरा व १५ टीएमसी पाणी मुळा धरणात सोडण्याचे नियोजन आहे.

गोदावरी कालव्याच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच नूतनीकरण व सक्षमी करणासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी पुणतांबा परिसरात ७६ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी व पिंपळवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

शिर्डी औद्यगिक वसाहतीत संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे हब विकसित होत आहे. या उद्योगांमुळे आणि टाटा समूहाच्या २०० कोटींच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. हरेगाव येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्पामुळे १० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. शिर्डी विमानतळ विस्तारीकरणासाठी ७०० कोटींचा निधी देण्यात आला असून, ‘एमआरओ सेंटर’च्या माध्यमातून ५ हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा विखे यांनी केला.