औरंगाबाद : ग्रामीण पोलीस विभागातील सात महिला पोलिसांसह १४ कर्मचाऱ्यांवर शनि अमावस्येच्या दिवशी भद्रा मारोती परिसरात लावलेल्या बंदोबस्ताच्या कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली. यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक सुटी असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
अशोक रगुनाथ नेवे, देवीदास साहेबराव साळवे, व्ही. व्ही. चौधरी, दिनेश परदेशी, दत्तात्रय लोटन सौंदाने, आर. एस. राख, सुनीता अशोक लाखमाल, संगीता गुलाबराव जाधव, एस. जी. पुगे, कांचन हरिश्चंद्र शेळके, मुक्ता एकनाथ कातकडे, शालिनी चव्हाण, द्रोपदी सीताराम जाधव, सुवर्णा एकनाथ मुंजाळ, असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी काढले होते. पोलीस निरीक्षक भूजंग हातवणे यांनी बंदोबस्ताच्या ठिकाणची पाहणी केली असता २० पैकी १४ कर्मचारी हजर दिसून आले नाहीत. त्यासंदर्भातील अहवाल उपअधीक्षकांकडे व तेथून पुढे पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला. त्यानंतर १४ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, दिवस व रात्र पाळीत बंदोबस्ताचे नियोजन असल्याने आणि एकानंतर दुसऱ्या सत्रावेळी काही कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी येत असल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. साप्ताहिक सुटी असल्याचे दाखवल्यानंतर निलंबनाचे आदेश मागे घेण्यात आले. त्यामध्ये आर. एस. राख, सुनीता लखमाल, कांचन शेळके, दिनेश परदेशी, सुवर्णा मुंजाळ व व्ही. व्ही. चौधरी यांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी काढले. राख, लखमाल, शेळके व परदेशी यांची २९ एप्रिल रोजी साप्ताहिक सुटी असल्याने त्यांना बंदोबस्तासंदर्भातील माहिती मिळू शकली नाही. तर मुंजाळ या कर्तव्यावर होत्या, हे स्पष्ट झाले. तर चौधरी हे कर्तव्यासाठी शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.