छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सिल्लोड सत्तार यांचे माध्यमी रंगलेले बंड शमले. शिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी पाटील डोणगावकर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूकीमध्ये तिघांचे अर्ज कायम राहिले. मात्र, प्रमूख विरोधकांच्या माघारीमुळे ‘भाजप’ ची बाजू अधिक मजबूत झाली आहे. रिंगणात आता भाजपचे सुहास शिरसाठ यांच्या विरोधात पर्यायी म्हणून गणेश लोखंडे यांनी भरलेला अर्ज प्रमूख उमेदवाराचा अर्ज म्हणून ग्राह्य धरण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरच्या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता तीन उमेदवार राहिले आहेत. यात गणेश लोखंडे, एमआयएमचे नगरसेवक तथा अपक्ष उमेदवार इसाक खान संदू खान हे निवडणूक लढणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली.
दुपारी देवयानी डोणगावकर आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे. या अनुषंगाने कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केवळ निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून अर्ज दाखल केला जावा, अशीच निवडणुकीची स्थिती होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली. सहकारामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्याने विधान परिषदेतील गणिते जुळणार नाहीत म्हणून निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला, या दरम्यान गंगापूर साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचीही नोटीस बजावली असल्याचे डोणगावकर म्हणाले.
आमदार सत्तार यांच्या मुलाचे बंड शमले
गेले आठ-दहा महिने माध्यमांच्या कोणत्याही चर्चेत सहभागी नसणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर यास उमेदवारी अर्ज भरायला लावला. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर भाजप शिवसेनेवर कसा अन्याय करत आहे, याबाबत जाहीर वक्तव्ये केली. परिणामी सत्तार हे बंडाच्या पवित्र्यात आहेत, असे चित्र निर्माण झाले. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आणि बंड होणार नाही असे जाहीर केले. मुलगा समीर यांनी उमदेवारी अर्ज मागे घेतला. या निवडणुकीमध्ये भाजपचे सुहास शिरसाठ, गणेश लोखंडे आणि इसाक खान सांदू खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात ६३७ मतदार आहेत.
