छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक ठिकाणी सीसीटिव्ही बंद ठेवून काॅपी करण्याचे किंवा शिक्षकांकडून उत्तरे सांगण्याचे प्रकार मराठवाड्यातील काही भागांमध्ये समोर आल्यानंतर त्यावरही उतारा शोधत छत्रपती संभाजीनगर जिल्हयाच्या माध्यमिक शिक्षण विभागाने थेट मोबाईल फोनमधूनच चित्रीकरण करण्याची मोहीम आखली आहे. याशिवाय परीक्षेची पारदर्शकता व शुचिता अबाधित राहावी यासाठी १६० दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६० परीक्षा केंद्रांवर कार्यरत राहून परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

दक्षता पथके केवळ प्रत्यक्ष परीक्षा कामकाजावरच नव्हे, तर प्रत्येक केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणेद्वारेही संपूर्ण निरीक्षण करणार आहेत. विशेष म्हणजे, या पथकांची दररोज अदलाबदल करण्यात येणार असून वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर नवीन पथके नियुक्त केली जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे, असा दावा केला जात आहे.

कन्नड तालुक्यातील जैतापूर गावात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सामूहिक काॅपीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी घडलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त, सुरक्षित व सकारात्मक वातावरणात परीक्षा देता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

परीक्षा केंद्रावर होणाऱ्या चित्रीकरणाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची टोकण पद्धतीने तपासणी, प्रवेशद्वारावर शारीरिक तपासणी, प्रवेशपत्र व ओळखपत्रांची पडताळणी, परीक्षा कक्षातील आसनव्यवस्था तसेच सीसीटीव्ही यंत्रणांची पाहणी यांचे बारकाईने चित्रीकरण केले जात आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असल्याने ती पूर्णपणे स्वच्छ, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी स्पष्ट केले.

पारदर्शकता राखण्याला प्राधान्य

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. दक्षता पथकांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर प्रभावी नियंत्रण राहील आणि विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता येईल. माध्यमिक शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, परीक्षेची विश्वासार्हता अधिक बळकट होईल. – अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).