छत्रपती संभाजीनगर – घराजवळच्या रहिवासी भागातील कांहींनी आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरून आणि तपास लावला जात नसल्यावरून ५० वर्षीय ज्येष्ठ महिलेने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणून रात्री ९ ते ११ पर्यंत ठिय्या मांडला. यातून परिसरात काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमधील काही जण शहरातील, बदनापूर व बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.
रेखा राजू जाधव (५०), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर विजय राजू जाधव (३३), असे तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रावरीवरून आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर मिळालेल्या माहितीनुसार, रेखा जाधव यांची २१ वर्षांची विवाहित मुलगी ८ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेली. तेव्हापासून घरात तणावाचे वातावरण होते. बेपत्ता तरुणीच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली, गल्लीतील एका व्यक्तीने तिला पळवून नेल्याचे समोर आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. परंतु रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. याच वेळी मुलीने जागा बदलल्याने ती सापडू शकली नाही. या सर्व घटनांमुळे रेखा या तणावात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मुलीला शोधण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वाढलेल्या मानसिक तणावामुळे रेखा जाधव यांनी राहत्या गळफास घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन मुलीसह इतर संशयितांना ताब्यात घेतले असते तर ही वेळ आली नसती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
मृत महिलेचा मुलगा रिक्षाचालक असल्याची माहिती देण्यात आली आहे. पती समोर झाडलोट करणाऱ्या रेखाबाई अचानक घरात गेल्या आणि त्यांनी गळफास घेतला. ही घटना समोर येताच संतप्त नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि थेट पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, निरीक्षक गजानन कल्याणकर, कृष्णा शिंद आणि संग्राम ताटे यांनी नागरिकांची समजूत काढली. आरोपीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. वैभव बोर्डे, विशाल बोर्डे, नंदू पवार, राजेंद्र पवार, गौरव बोर्डे यांच्यासह चार महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उस्मानपुरा पोलिस करीत आहेत.
