छत्रपती संभाजीनगर : शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर बहुमताच्या जवळ पोहचलेल्या भाजपने महापौर पदाचे उमेदवार म्हणून समीर राजूरकर यांचे नाव जाहीर केले. शुक्रवारी अचानक महापालिकेत ‘मैत्रीपूर्ण’ लढत दिल्याची आठवण ठेवत महापालिकेच्या राजकारणात पुन्हा युतीची घोषणा करत उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या वेळी महायुतीच्या नेत्यांमध्ये समाजकल्याण मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांची अनुपस्थिती भुवया उंचवायला लावणारी होती.
छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. तब्बल ५६ जागा भाजपला मिळाल्यानंतर भाजप स्वतंत्रपणे महापौर – उपमहापौर या पदांसह सर्व जागांवर ताबा मिळवेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मुंबईवरुन महापौर पदाचे नाव ठरवतानाच सत्तेमध्ये ‘शिवसेने’चाही वाटा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपचे नेते मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख पुढाऱ्यांच्या बैठका शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने मुंबईहून अचानकपणे निवडणूक प्रभारी म्हणून विलास पारकर यांना पाठविण्यात आले. त्यांनी उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचे नाव सुचिवले. या नावाचे पत्र भाजप नेत्यांकडे पोहचल्यानंतर उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बहुमताच्या अगदी जवळ असतानाही शिवसेनेची सत्तेत गरज कशासाठी भासली असे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीमध्ये विचारला असता मंत्री अतुल सावे म्हणाले, ‘ आम्ही राज्यात सत्तेत एकत्रित आहोत. राज्यातील नेत्यांनी या अनुषंगाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये आम्ही एकत्र आलो आहोत. ’ पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीमध्ये संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता. शिवसेनेला १३ जागांवर समाधान मानावे लागले. विजयाचा आकडा कमी होण्यामागे पालकमंत्री संजय शिरसाट असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर सत्तेमध्ये शिवसेनेला वाटा देताना राजेंद्र जंजाळ यांचे नाव पुढे आले. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन पंख छाटले जात असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
निवडून आलेल्या ५६ नगरसेवकांमध्ये १७ नगरसेवक ‘ मराठा’ जातीचे आहेत. या पार्श्वभूमीवर नेता म्हणून जातीय समीकरणेही लक्षात घेतली जातील, असा अंदाज बांधण्यात येत होता. गेल्या काही वर्षांत निवडणुकांच्या कामांमध्ये बारकाईने नियोजन करणाऱ्या व्यक्तीला पुढे आणले जावे, अशी मागणी केली जात होती. त्यात समीर राजूरकर यांचे नाव आघाडीवर होते. मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड तसेच अन्य नेत्यांनी चार नावांची यादी प्रदेश कार्यालयास सादर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
समीर राजूरकर हे भारतीय जनता युवा मोर्चापासून भाजपमध्ये काम करत असून २०२४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीचे संयोजकत्व ही जबाबदारी सांभाळली होती. गंगापूर विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका निवडणुकीमध्ये प्रमुख म्हणून काम करणाऱ्या समीर यांना शहरातील समस्यांचे तपशील बारकाईने माहीत आहेत. ‘या महापालिकेचा कारभार पारदर्शक करू,’ असे एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने महापौरपद स्वीकारल्यानंतर राजूरकर यांच्यासमोर पारदर्शक कारभाराचे मोठे आव्हान असेल, असे सांगण्यात येत आहे.

