छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये समीर राजूरकर हे ७० मते घेऊन विजयी झाले. त्यांनी एमआयएमच्या अशोक हिवराळे यांचा ३७ मतांनी पराभव केला. हात उंचावून झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेची युती होती. भाजपच्या ५७ तर शिवसेनेच्या १३ नगरसेवकांनी राजूरकर यांच्या बाजूने मतदान केले. शिवसेना उद्धव ठाकरे सहा आणि बहुजन वंचित आघाडीचे चार सदस्य मतदाना दरम्यान तटस्थ राहिले. उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ हेही तेवढेच मतदान घेऊन निवडून आले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौर पद स्वीकारल्यानंतर , ‘शहरातील पाण्याच्या प्रश्नी सविस्तर बैठक घेऊन मगच त्यावर बोलू. प्रत्यक्ष सुरू असणारे काम आणि मिळालेली माहिती यात तफावत असू शकते. मात्र, शहरातील कचऱ्या प्रश्नावर लोकसहभाग घेऊन काम करावे लागेल. अहमदाबाद किंवा सुरत सारखी शहरे लोकसहभागातून स्वच्छ झाली आहेत. तसेच काम करू. शहरातील अनाधिकृत फलक काढले जातील अगदी महापौर म्हणून माझेही फलक लागले तरी ते काढा, असे प्रशासनाला सांगणे आहे.’ असे सएमीर राजूरकर म्हणाले.
महापालिकेच्या महापौर निवडणुकीपूर्वी एमआयएमच्या सर्व सदस्यांनी शेरवानी आणि हिरव्या रंगाचा फेटा बांधला होता. भाजपचे सर्व सदस्य भगवा फेटा आणि मोदी जॅकेट घालून सभागृहात आले होते. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा देण्यासाठी मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, संजय खंबायते आदींची उपस्थिती होती. या पूर्वी शिवसेनेचा वरचष्मा असे, महापौर पदी आता शिवसेना नाही याबाबत मंत्री शिरसाट यांना विचारले असता, ‘ या पूर्वी अनेकदा शिवसेनेचे महापौर झाले होते. आता युतीचा महापौर होतो आहे. सख्या बळ बदलत असते. पण युतीचा महापौर झाल्याचा आनंद आहे. ‘ या निवडणूक प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काम पाहिले तर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची या वेळी उपस्थिती होती.
उपमहापौर पदाच्या निवडीनंतर घोषणाबाजी
शिवसेनेच्या वतीने उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ यांचे नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र आदेशाने जाहीर करण्यात आले होते. या नावास पालकमंत्री संजय शिरसाट यांचा विरोध होता. मात्र, तरीही जंजाळ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पाठबळ वाढविण्यासाठी मुंबईहून आलेले विलास पारकर यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनीच जंजाळ यांच्या नावाच्या शिफारशीचा कागद पालकमंत्र्यांपर्यंत पोहचवला होता. महापालिका परिसरात आल्यानंतर शिवसेनेचा वाघ आल्या अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. निवडीनंतर ‘गार, गार वाटतय, गंमतीमधी ’ अशा आशयाचे घोषवाक्य असणारे फलक महापालिका परिसरात दिसत होते. राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या घोषणा असल्याचे मानले जात होते.
‘‘महापालिकेच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी महापालिकेची प्रतिमा बदलण्याची आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग तीन स्तरावर केला जाईल. पहिल्या तीन महिन्यासाठी एक छोटा आराखडा तर संपूर्ण वर्षासाठी एक आराखडा ठरवला जाईल. अगदी महापौर दालनापासून काटकसरीला सुरुवात करू.
समीर राजूरकर, महापौर, छत्रपती संभाजीनगर
