छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावरील वाहतुकीमध्ये या वर्षी मोठी वाढ दिसून आली. गेल्या वर्षी समृद्धीवरून एक कोटी पाच लाख १३ हजार ८३४ वाहने गेली होती. या वर्षी त्यात ५७ लाख ४० हजार वाहनांची भर पडली.

वेळ वाचविण्यासाठी या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीतून या वर्षी १२४० कोटी ४ लाख ४६ हजार ५३० रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. तो गेल्या वर्षीपेक्षा ४९५ कोटी ४१ लाख ६३ हजारांपेक्षा अधिक असल्याच्या नोंदी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे उपलब्ध आहेत.

समृद्धी महामार्गावरून औद्योगिक वाहतुकीस प्राधान्य मिळू लागले आहे. जेव्हा हा रस्ता थेट वाढवण बंदरापर्यंत जाईल तेव्हा औद्योगिक वाहतूक वाढू शकते. गेल्या वर्षात ८० टक्के औद्योगिक वाहतूक ‘समृद्धी’ वरून झाल्याचे निरीक्षण उद्योजक राम भोगले व्यक्त करतात. ते म्हणाले, भिंवडी आणि ठाणे या दोन ठिकाणची वाहतूक कोंडी सुकर झाली तर मुंबईत जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा वेग वाढेल. तेव्हा समृद्धीवरून वाहतूक अधिक वाढेल. पुढे हा रस्ता गुजरात मार्गे पुढे जाईल तसतशी वाहतूक वाढेल.

एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीमध्ये एक कोटी ६२ लाख ५४ हजार ३३६ वाहने समृद्धी महार्मागावर आली आणि त्यांनी टोल भरला. कमी वेळेत पोहोचण्यासाठी निवडलेल्या या मार्गावर अपघाताचे प्रमाणही अधिक असले तरी तो मार्ग वापरण्यास पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत समृद्धीच्या वाहतुकीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

नागपूर- मुंबई हा समृद्धी महामार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. पहिल्या चार महिन्यांत १४ लाख ३४ हजार ५४५ वाहनांनी समृद्धीवर टोल भरला. ती रक्कम होती १०६ कोटी ४१ लाख ५० हजार एवढी. पुढे त्यात वाढ होत गेली. २०२३ मध्ये ७२ लाख ५४ हजार ११६ वाहनांनी समृद्धीचा वापर केला. पुढे २०२४ मध्ये एक कोटी ५ लाख १३ हजाराहून अधिक वाहनांनी ७४० कोटी रुपयांचे वाहतूक शुल्क भरले. या वर्षी त्यात मोठी वाढ झाली आहे.

समृद्धी महामार्ग आणि औद्योगिक वसाहती जोडणारे रस्ते तयार करण्याची औद्योगिक संघटनांची मागणी आहे. त्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. हे रस्ते जोडल्यानंतर मालवाहतूक अधिक वेगवान होईल. तसेच कृषिमालही मुंबई बजारपेठेत लवकर दाखल होईल.

सध्या या समृद्धीच्या वाढीस भिवंडीमधील कोंडी अडथळा ठरत असल्याचे वाहतूकदार फय्याज खान सांगतात, भिवंडीपासून मुंबईला जाण्यासाठी बऱ्याचदा दोन-अडीच तास लागतात. तो कालावधी बऱ्याचदा साडेतीन तासापर्यंत जातो. त्यामुळे भिवंडीतून कोंडी सोडविण्यचे प्रयत्न झाले तर व्यापारी वाहतूक सुलभ होऊ शकेल.

डिसेंबरमध्ये वाहतूक अधिक

गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्यात वाहतूक अधिक असल्याचे दिसून आले आहे. २०२२ – २३ मध्ये सात लाख ७५ हजार, त्यानंतरच्या वर्षात १० लाख ३१ आणि डिसेंबर २०२५ मध्ये १६ लाख ६१ हजार वाहने धावली. या महिन्यात टोलही वाढल्याचे दिसून येते.