सांगली : खून प्रकरणातील साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्याचा प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात समोर आला असून संशयितांनी खून झालेल्याचे पार्थिव कर्नाटकात नेउन आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी बुधवारी दिली.
मृत व्यक्तीचे नाव दादासो नामदेव यमगर असे असून तो कोसारी (ता. जत) मध्ये २०२३ मध्ये झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार आहे. मंगळवारी तो खून प्रकरणातील फिर्यादी प्रवीण यमगर याच्यासोबत जाणार होता. या दरम्यान, सकाळी दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी नागज फाटा येथील पंपावर गेला असता त्याचे अज्ञाताकडून अपहरण झाले. यानंतर त्याचा भ्रमणध्वनीही बंद ठेवण्यात आल्याने संशय बळावला. या प्रकरणी अपहरण झाल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा दाखल करण्यात आली.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अपहृत व्यक्तीचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी मदभावी (ता. अथणी) परिसरात यमगर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत मिळाला. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलीसांनी घटनास्थळी जाउन पाहणी केली असता यमगर यांची हत्या करून आत्महत्या दर्शविण्यासाठी गळफास लावण्यात आल्याचे दिसून आले.
या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कांबळे यांनी सांगितले, यमगर यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कोसारी (ता. जत) मध्ये २०२३ मध्ये विहीरीतील गाळ काढण्यावरून दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली होती. या हाणामारीत विलास व प्रशांत यमगर या दोघांचा खून झाला होता. या दुहेरी खून प्रकरणी जत पोलीसांनी एका महिलेसह आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली होती. यातील दोघेजण जामीनावर बाहेर आले आहेत. या खून प्रकरणात दादासो यमगर हा प्रमुख साक्षीदार असून त्याचाच अपहरणानंतर खून झाला आहे.
