जिल्हाभरात २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत १ लाख कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार असून यातून पाणंदमुक्त गाव योजनेला बळकटी येईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब शेलार यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदांना या अभियानासंबंधीचे परिपत्रक जारी केले होते. आतापर्यंत लातूर जिल्हय़ातील २०२ गावे पाणंदमुक्त झाली असून या वर्षी २८४ गावे पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठरवले आहे. या गावातील एकूण ५७ हजार घरांपकी आतापर्यंत ५ हजार घरात शौचालय बांधण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे ४० गावे पाणंदमुक्तीच्या टप्प्यात आहेत. ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सरपंच, ग्रामसेवक यांचा मेळावा घेऊन सर्वाना घरोघरी जाऊन नेमके काय सांगायचे, त्यांच्या शंकांचे कसे निरसन करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ज्या घरात शौचालय बांधलेले असून त्याचा दैनंदिन वापर होत असेल, तर त्यांच्या दारावर हिरव्या रंगाचे स्टीकर, एखाद्या घरात शौचालय बांधलेले आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याचा नियमित वापर होत नसेल तर तो वापर करणे कसे आवश्यक आहे यासंबंधी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना नियमित वापरासाठी प्रवृत्त करावे, असे सांगितले जाईल. मात्र तोपर्यंत त्यांच्या दारावर पिवळय़ा रंगाचे स्टीकर लावले जाणार आहे.

ज्यांच्या घरात शौचालय नाही व जे उघडय़ावर शौचालयास जातात त्या कुटुंबीयांना यामुळे होणारे आजार व आरोग्याचे धोके समजावून सांगून शासन शौचालय बांधण्यासाठी देत असलेले अनुदान यासंबंधी तपशीलवार बोलून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तोपर्यंत त्यांच्या दारावर लाल रंगाचे स्टीकर चिकटवले जाणार आहे. शौचालय बांधणीचे या मोहिमेंतर्गत जे काम होते आहे, त्याची छायाचित्रे रोजच्या रोज संगणकाद्वारे राज्य शासनाकडे पाठविली जातात. या मोहिमेत सुमारे ६० टक्के छायाचित्रे पाठवून झाली असून लातूरचे काम आघाडीवर असल्याचे शेलार म्हणाले.

५७ हजार घरांपकी ५२ हजार घरांपर्यंत जिल्हय़ात पोहोचायचे असले, तरी जिल्हा परिषदेच्या वतीने एकूण १ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात महास्वच्छता मेळावे घेतले जाणार असून या मेळाव्यात पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य अशा सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाणार आहे.

पाऊस कमी असणे, शेतीचे उत्पन्न कमी असणे अशा अडचणी ग्रामीण भागात आहेत. मात्र या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिक स्थिती बळकट केली पाहिजे. आजाराला आमंत्रण देऊन त्यातून उद्भवणाऱ्या खर्चापेक्षा आपले आरोग्य चांगले राहणे आवश्यक असल्याचे आम्ही लोकांना समजावून देत आहोत, असे शेलार म्हणाले.