परभणी: हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात स्थानिक पातळीवर घडामोडींना वेग आला असतानाच खासदार संजय जाधव हे अचानक काल मंगळवारी (दि.१६) सायंकाळी नांदेडहून खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या खासदार जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मनातून सोडचिठ्ठी दिलीच होती. आता प्रत्यक्ष उबाठा सेनेतल्या खासदारांचा एक स्वतंत्र गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठीच खासदार जाधव तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
विधान परिषदेच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती मात्र पुन्हा खासदार कोणत्याच राजकीय घडामोडीत दिसले नाहीत. गेला महिनाभर लोकसभा मतदारसंघातल्या विविध धार्मिक स्थळी आयोजित केलेल्या धोंडे जेवणाला त्यांची उपस्थिती होती. अधिकमासानंतर खासदार जाधव यांच्या पक्षांतर मोहिमेला गती येईल असे अपेक्षित होते त्यानुसार हालचाली सुरू झाल्या.
नांदेड येथे काल सायंकाळी आलेल्या एका खाजगी विमानात खासदार जाधव यांच्यासह आणखी एक खासदार दिल्लीकडे रवाना झाले. उबाठा शिवसेनेचा स्वतंत्र गट आता आकाराला येत आहे. विशेष म्हणजे मुंबईत शुक्रवारी (दि.१९) शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे कार्यक्रम आहेत. शिंदे शिवसेनेच्या कार्यक्रमात खासदार जाधव हे व्यासपीठावर दिसतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासूनच्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळणार आहे.
एक वर्षांपूर्वी उबाठा शिवसेनेत मोठी फूट पडणार असे वृत्त आल्यानंतर ‘टायगर ऑपरेशन’ वगैरे असे काही नाही हे सगळे फेल आहे. अशी प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी दिली होती. सातत्याने आपण उद्धव सेनेसोबतच राहणार याचा पुनरुच्चार त्यांनी वारंवार केला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ते उबाठा शिवसेनेशी अंतर ठेवून होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात तूर्त तरी इथेच आहे. पुढचे सांगता येत नाही असे उद्गार त्यांनी काढले. राजकीय आयुष्यात चढउतार असतात पण किती दिवस विरोधी पक्षात संघर्ष करायचा. सत्तेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. असे ही ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर उबाठा शिवसेनेनेही खासदार जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराची मानसिकता करून ठेवल्याचे दिसून आले.
अलीकडेच शिवसेना नेते, माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत खासदार जाधव यांचे नाव न घेता टीका केली होती. या बैठकीला खासदार जाधव यांची अनुपस्थिती अपेक्षित असली तरी दानवे यांच्या विधानाने अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आता आमदार राहुल पाटील हेच शिवसेनेचे नेते आहेत. अन्य कोणी तुम्हाला बोलावून घेईल, वेगळे काही सांगेल पण कुणाचेही ऐकायचे नाही. पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही असे दानवे यांनी या बैठकीत स्पष्ट केले होते. मनाने उबाठा शिवसेनेतून केव्हाच बाहेर पडलेले खासदार जाधव हे विधान परिषद निवडणुकीनंतर प्रवेश करतील असे वाटत असतानाच काल ते अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले.
विशेष म्हणजे यावेळी त्यांचा नेहमीचा अंगरक्षकही सोबत नाही. त्यांच्या स्थानिकच्या स्टाफला याबाबत काहीही माहिती नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार जाधव यांच्यासह आणखी सहा खासदारांचा गट तयार झाला असून आज दिवसभरात या गटाच्या बैठका दिल्लीत पार पडतील. एवढेच नाही तर शुक्रवारी (दि.१९) मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर हा सर्व गट पक्षात विलीन होईल. तत्पूर्वी वेगळ्या गटाच्या अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी दोन दिवसात पार पाडल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.
