परभणी : खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल पाटील हे आता अधिक सक्रिय झाले असून त्यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्ह्याची धुरा आता आली आहे. अधिक मासानिमित्त राजकीय कार्यकर्त्यांच्या धोंडे जेवणाची पर्वणीही आता सुरू झाली असून सोनपेठ तालुक्यात एका जाहीर कार्यक्रमात धोंडे जेवणाच्या निमित्ताने आमदार पाटील यांनी उबाठा शिवसेनेला अधिक बळकट करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आतापर्यंत केवळ परभणी विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या आमदार पाटील यांनी आता जिल्हा दौरेही सुरू केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून पक्षानेही आमदार पाटील यांच्यावर जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी देऊन खासदार संजय जाधव यांची पर्यायी व्यवस्था करण्याचा बंदोबस्त केल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विटा (ता. सोनपेठ) येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व अधिक मासा निमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम रविवारी (दि.१७) आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पाथरी विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, परभणी महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, मुंजाभाऊ कोल्हे, तालुकाप्रमुख संतोष गवळी, हरिभाऊ वाकणकर, शहरप्रमुख अमोल दहीवाळ, शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नुकतेच शिवसेनेने जिल्हा कार्यकारिणीत अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली असून खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांची उचलबांगडी केली आहे. अद्याप तांत्रिक दृष्ट्या खासदार जाधव हे उबाठा शिवसेनेतच असले तरी पक्षाच्या कार्यक्रमांना व बैठकांना त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. खासदार जाधव हेच आत्तापर्यंत उबाठा शिवसेनेचे जिल्ह्याचे नेतृत्व करत होते मात्र त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाल्यानंतर आता पक्षाने त्यांचा पर्यायी बंदोबस्त करण्यासाठी आमदार पाटील यांच्याकडे जबाबदारी दिल्याचे अलीकडच्या राजकीय कार्यक्रमांमधून जाणवत आहे.

देशात वाढत्या महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन यावेळी आमदार पाटील यांनी केले. परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील म्हणाले, पुढील काळात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून येतील. जिल्ह्यात पक्ष संघटना ही नव्या जोमाने उभी करून मजबूत करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गवळी यांनी केले तर कृष्णा पिंगळे, हरिभाऊ वाकणकर, रवींद्र धर्मे, कल्याणराव रेंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाला उपशहर प्रमुख जनार्दन झिरपे, श्रीकृष्ण साठे, बागुल शेख, कैलास गिराम, तुकाराम साठे, विशाल भोरे, भास्कर भोसले, जगन्नाथ कोलते यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच विटा येथील ग्रामस्थ, शिवसैनिक तसेच महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.