छत्रपती संभाजीनगर: स्थायी समितीच्या निवडीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबातील दोन्ही नगरसेवकांना खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आल्याचे निवडीनंतर स्पष्ट झाले. स्थायी समिती समितीसह विविध समित्यांवरील नियुक्त्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये भाजपचे आठ, एमआयएमचे चार आणि शिवसेनाच्या शिंदे गटाचे दोन, ठाकरे गटाचे एक आणि वंचित बहुजनच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. मात्र, यात संजय शिरसाट यांचे पूत्र सिंद्धात आणि मुलगी हर्षदा यांच्या नावाचा समावेश नव्हता. महापालिकेतील राजकारणात शिरसाट यांच्या मुलास किंवा मुलीस महापौर पद मिळेलच असा दावा शिरसाट समर्थक करत हाेते.

महापालिका निवडणुकीमध्ये बहुमतास केवळ एक नगरसेवक कमी पडला. भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेवर त्यांचे वर्चस्व राहील असे मानले जात होते. मात्र, निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या महायुतीमधील मित्र पक्षास बरोबर घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे शिवसेनेबरोबर युती करण्यात आली. राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपदही देण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीमध्ये शिवसेनेस फारसे स्थान मिळणार नाही हे स्पष्ट होतेच. मात्र, मंत्री शिरसाट यांचा मुलगा किंवा मुलगी यांची या समितीमध्ये वर्णी लागेल असे मानले जात होते.

मात्र, महापालिकेच्या राजकारणात मंत्री शिरसाट यांना फारसे महत्त्व न देता संजय शिरसाट यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंख कापले. उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्या बोचतील अशा घोषणा लिहून ‘ जल्लोष’ केला होता. त्यामुुळे महापालिकेत राजेंद्र जंजाळ यांचेच वर्चस्व राहील असा संदेश देण्यात आला होता. स्थायी समितीच्या निवडीमध्येही शिरसाट यांचे नगरसेवक चिरंजीव सिंद्धात आणि हर्षदा यांना पद्धतशीरपणे टाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या वतीने कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना निळकंठ, माधुरी आदवंत, अप्पासाहेब हिवाळे यांची निवड करण्यात आली तर एमआयएमच्या वतीने मेराज खान जलील खान, पठाण अजहर अय्युब, खान अल्मास खान आमजद यांची नावे आहेत तर शिवसेनेच्या वतीने श्वेता त्रिवेदी, राजू राजपूत यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील सचिन खैरे आणि वंचित बहुजनचे अमित भुईगळ यांची स्थायी समितीवर निवड झाली आहे. स्थायी समिती महापालिकेती महत्त्वपूर्ण समिती मानली जाते.