सातारा : वाई एमआयडीसी परिसरातील एका नामांकित फाउंड्री कंपनीत शनिवारी (दि. १८) एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. येथे काम करणाऱ्या झारखंडमधील एका ४२ वर्षीय कामगाराने चालू मेटल भट्टीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
दुर्गा रोहिता प्रधान (वय ४२, मूळ रा. राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम, राज्य झारखंड; सध्या रा. वाई एमआयडीसी परिसर) असे मृत कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुर्गा प्रधान हे गेल्या काही दिवसांपासून तीव्र नैराश्यात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फाउंड्रीमध्ये काम सुरू असताना, त्यांनी अचानक धगधगत्या मेटल भट्टीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, भट्टीतील तीव्र उष्णतेमुळे व प्रचंड तापमानामुळे प्रधान यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून वाई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच झारखंडमधील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथकानेही घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक ते पुरावे आणि नमुने गोळा केले आहेत. प्रधान यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
