छत्रपती संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांची चिंता वाढली. येत्या दोन महिन्यानी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये विक्रम काळे हेच राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार असतील, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. आमदार विक्रम काळे हेही शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा विजयी ठरले आहेत. त्यांच्याही कार्यशैलीवर नाराजी आहेच, असा दावा केला जात आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जागावाटपाची चूक शिक्षक मतदारसंघात भाजपकडून होणार नाही, असा दावा केला जात आहे. पदवीधर मतदारसंघातील रोष खूप अधिक होता. महायुतीचा प्रमुख पक्ष म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काम केलेच. पण नाराजी एवढी होती की, ती रोखू शकलो नाही, असे भाजपचे आमदार संजय केनेकर म्हणाले. पण शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या मनातील उमेदवार असेल, असा दावा केनेकर यांनी केला.
राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या पदवीधर विभागाचे अध्यक्ष आणि अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे म्हणाले, ‘‘ जी नाराजी सतीश चव्हाण यांच्या विरोधात हाेती त्याच पद्धतीची नाराजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याविषयीही आहे.
मुंबईत अंशत: अनुदानित लढ्यासाठी शिक्षक आंदोलनास बसले होते. आम्ही सगळे तळ ठोकून होतो. पण या आंदोलक शिक्षकांकडे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण आले नव्हते. ना शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे फिरकले. या दोन्ही आमदारांची कार्यशैली सारखीच आहे.’
सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा निवडून आले होते. ते चौथ्यांदा निवडून आले तर मंत्री होतील, असा दावा केला जात होता. ‘लाल दिव्या’च्या गाडीची मागणी विक्रम काळे यांनी दोन वेळा जाहीरपणे केली आहे.
मात्र, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तेही फारसा पुढाकार घेत नाहीत, असा दावा आता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाकडून केला जात आहे. याचे प्रतिसाद समाजमाध्यमांमध्येही उमटत असून पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला आणि समाज माध्यमी ‘ गुड मॉर्निंग विक्रम काळे ’ असा संदेश आवर्जून लिहिला गेला. या अनुषंगाने आमदार विक्रम काळे यांना पदवीधर मतदारसंघातील सतीश चव्हाण यांच्या पराभवाबाबतचे विश्लेषण करताना आमदार विक्रम काळे म्हणाले, देशभर तरुणांची आंदोलने सुरू आहेत. ही मुले आमच्यापासून दुरावली आहेत, असे या निकालावरून दिसून येते. शिक्षक मतदारसंघाबाबतही ही काळजी आहेच. पण आतापर्यंत मी अयोग्य वागलेलो नाही. यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन .’
