नांदेड : बँकेतील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेला हरताळ फासणारी एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. ग्राहकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत गहाण ठेवलेल्या खऱ्या सोन्याच्या जागी बनावट सोने ठेवून तब्बल ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेच्याच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली असून, या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आदित्य प्रकाश सेनगावकर (वय ४०, रोकड व्यवस्थापक) आणि जीवन माधवराव जगदाळे (वय ३९, सेवा व्यवस्थापक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत. बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजीव अनंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

खऱ्या सोन्याच्या जागी ठेवले बनावट दागिने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या डॉक्टर लेन परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आठ ग्राहकांनी आपले एकूण ८०५.९० ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. ग्राहकांचे हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी रोकड व्यवस्थापक सेनगावकर आणि सेवा व्यवस्थापक जगदाळे यांच्यावर होती. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करून २७ जून २०२५ ते ११ मे २०२६ या कालावधीत लॉकरमधील खऱ्या सोन्यावर डल्ला मारला. त्यांनी मूळ ८०५.९० ग्रॅम सोन्यापैकी ३९१.६० ग्रॅम वजनाचे खरे सोन्याचे दागिने लंपास केले आणि पकडले जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी हुबेहूब दिसणारे ४१४.३० ग्रॅम वजनाचे बनावट सोने ठेवून दिले.

बँकेच्या अंतर्गत तपासणीदरम्यान सोन्याच्या वजनात आणि गुणवत्तेत तफावत असल्याचे बँक व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकाराची कसून शहानिशा केली असता, दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनीच हा चुना लावल्याचे स्पष्ट झाले. मुख्य व्यवस्थापक राजीव कदम यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून सेनगावकर यास अटक केली तर जगदाळे हा १२ मेपासून फरार आहे.
स्टेट बँकेसारख्या नामांकित बँकेत आणि तेही चांगला पगार असताना या अधिकाऱ्यांनी हे धाडस का केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुन्ह्यामुळे पोलिसांसमोर अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.

तपास सुरू

बँकेत पैसे आणि दागिने सर्वात सुरक्षित राहतील या विश्वासाने ग्राहक बँकेकडे पाठ फिरवत नाहीत, पण कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करत आहेत. आरोपींच्या पोलीस कोठडीत या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.