|| बिपिन देशपांडे
औरंगाबाद : ५२ दरवाजांचे शहर ही औरंगाबादची ओळख. पण बरेच ऐतिहासिक दरवाजांची पडझड सुरूच आहे. त्यातील १५ दरवाज्यांची डागडुजी सुरू आहे. पण या डागडुजीच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. ऐतिहासिक बांधकामाशी संबंधित अभ्यासकांच्या निगराणीखालीच काम झाले तर शहराचा पुरातन वारसा जतन करता येईल, असे अभ्यासकांचे मत आहे.
औरंगाबाद शहरात पूर्वी ५२ दरवाजांमधून प्रवेश करण्याचे मार्ग होते. यातील अनेक दरवाजांचे ठिकाण म्हणजे आता भग्नावशेष म्हणून उरले आहेत. त्याचे पुनर्निर्माण आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबादतील रोशन (गेट) दरवाजा, कटकट दरवाजा, मेहमूद दरवाजा, आदी सर्व बांधकाम चिरेबंदी ढाच्यातील आहे. या दरवाजांच्या परिसराचे चुन्यासह बूट र्पँटगद्वारे नवनिर्माण केले जात आहे. याशिवाय हिरवळ लावून अधिक देखणे स्वरूप करण्यात येणार आहे. यातील काही दरवाजांच्या ठिकाणी चुना घोटण्याचे काम करण्यात आलेले आहे. मात्र या कामाबाबत इतिहास अभ्यासकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ऐतिहासिक स्थळ, वास्तूंची डागडुजी ही वास्तुविशारद अभ्यासकांच्या देखरेखीखालीच होणे अपेक्षित असून चुना, गूळ, उडीद दाळ, बेल आदी साहित्यांचा अंतर्भाव करूनच काम करावे. त्यामुळे संबंधित ऐतिहासिक वास्तूचे जतन दीर्घ काळ करता येऊ शकते, असे यातील तज्ज्ञांचे मत आहे.
कटकट गेटजवळ केलेल्या पाहणीत डगरांमधील सांधीत बूट र्पँटग पद्धतीतील विटांची आणि दगडांची भुकटी मिश्रण वापरल्याचे दिसून येत आहे. दरवाजा ठिकाणच्या भिंतीतील चिऱ्यांच्या भागात चुना घोटणीमध्ये उडीद दाळ, गूळ आदी वापरला का नाही, हे सांगता येत नाही, असे कारागिराकडूनच सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कामाचे कंत्राटदार मोहम्मद इरफान यांनी सांगितले की, आपल्याकडे पाच दरवाजांच्या पुनर्निर्माणाचे काम आहे. ऐतिहासिक कामासंबंधीच्या इन्टॅक्ट कमिटीच्या निगराणीखालीच काम होत आहे. मुलर यंत्राद्वारे स्वतंत्र सुरकीचा (विटांची पावडर आणि जेली) वापर करून काम करण्यात येत आहे. यासाठी सोलापूर, लातूर येथील अनुभवी कामगार काम करत आहे. कामामध्ये काही अडचण निर्माण झाली तर पाच वर्षे आम्ही दुरुस्ती करून देण्याला बांधील आहोत. नामशेष होण्याच्या अवस्थेतील दरवाजांचे पुनर्निर्माण होत आहे, हे ही महत्त्वाचेच आहे.
ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी करताना ती अभ्यासकांच्या निगराणीत होणे अपेक्षित आहे. अशा वास्तूंचे आयुष्य वाढेल, यादृष्टीने काळजी घेऊनच काम करावे लागेल. कामामध्ये वरवरचे लेपन असेल तर संबंधित वास्तु, दरवाजांचे आयुर्मान कमी होईल. ऐतिहासिक वास्तुंच्या बांधकामात अनेक ठिकाणी चुना, गूळ, उडदाची दाळ, अशा साहित्यांचे मिश्रण वापरण्यात आलेले आहे. त्याचा विचार करूनच आताही होणाऱ्या पुनर्बांधणीच्या कामात साहित्याचा योग्य तो वापर होणे अपेक्षित आहे. – डॉ. दुलारी कुरेशी, इतिहास अभ्यासक.