scorecardresearch

दुसरे विश्व अहिराणी संमेलन २२ ते २४ जानेवारीला

आता अहिराणी भाषेला ८ व्या परिशिष्टात समाविष्ट करून ती अभ्यासात आणण्यासह जनगणनेतही स्थान मिळण्याचे काम करायचे आहे.

औरंगाबाद : इंडो-आर्यन भाषेचा दर्जा मिळालेल्या आणि बंगळुरू येथील भारतीय भाषेची विज्ञान भवनसह युनोस्कोनेही दखल घेतलेल्या अहिराणी भाषेचे दुसरे विश्व संमेलन येत्या २२, २३ व २४ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेले आहे.  संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील तर स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण हे राहणार आहेत, अशी माहिती जागतिक अहिराणी परिषदेचे मराठवाडा प्रदेशाचे अध्यक्ष विनायक पवार, उपाध्यक्ष डॉ. दौलत सोनवणे, सचिव कैलास पाटील आदींनी येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली. बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२० साली पहिले विश्व अहिराणी संमेलन ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आले होते. यामध्ये भारतासह २७ देशातील अहिर बांधवांनी सहभाग घेतला होता. आता अहिराणी भाषेला ८ व्या परिशिष्टात समाविष्ट करून ती अभ्यासात आणण्यासह जनगणनेतही स्थान मिळण्याचे काम करायचे आहे. तसेच संमेलनाच्या माध्यमातून खान्देशी गतवैभवाचा इतिहास उलगडला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे संमेलनाचा लाभ कुटुंबातील सर्व सदस्यांना घेता येणार आहे. त्यातून साहित्यिकांचे मौलिक विचार ऐकता येणार आहेत. परिसंवाद, चर्चासत्र, लोककला, कार्यशाळा, लोकसंगीत, लोकनृत्य, संस्कृती, पर्यटन आदींच्या माध्यमातून, चिंतनातून, विचार मंथनातून व सादरीकरणातून देशविदेशातील नामवंत साहित्यिकांना भेटण्याची आणि रंगतदार कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. तसेच गुजर, लेवा, भिलाऊ, आदिवासी व ग्रामीण बोली भाषेत लेख, निबंध, साहित्य, कविता, चारोळ्या, वात्रटिका, विनोद, विडंबन व इतर साहित्य प्रकार ई-बुकच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा मानस आहे

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second world ahirani summit on 22nd to 24th january akp

ताज्या बातम्या