बिपीन देशपांडे

करोनाबाधित रुग्णांजवळ जाऊन त्यांची गोळ्या-औषधे घेण्याबाबत जशी काळजी घेतली जाते तसेच त्यांच्या परिसराच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागते. मग त्यात रोजच्या रोज रुग्णांना स्वच्छ कपडे देणे, खाटावरील अंथरूण, कक्षातील खिडक्यांचे हिरवे पडदे धुणे, अशी कामे परिचारिकांनाही करावी लागतात. ‘‘करोना सोबतची लढाई ही आता केवळ रुग्णसेवेपुरतीच राहिली नाही. ती आता देशसेवा झालीय, याची जाणीव घरी गेल्यानंतर मुलगा करून देतो तेव्हा लढण्याचे आणखी बळ मिळते.’’ असे सांगताना अधीपरिचारिका आशाताई क्षीरसागर यांच्या बोलण्यातून अभिमानच ध्वनित होत होता.

चिकलठाण्यातील शासकीय रुग्णालय आता करोना रुग्णालयच झालेले आहे. या रुग्णालयात सध्या १३४ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या औषध-गोळ्यांबाबत जशी काळजी डॉक्टर, परिचारिकांचा वर्ग वाहत आहे, तशीच स्वच्छताही कटाक्षाने जपली जाते. ही जबाबदारी सध्या अधीपरिचारिका आशाताई क्षीरसागर यांच्यासह तिघींवर आहे. दिवसभरात प्रत्येक रुग्णांच्या खाटेवरील बेडशिट, खिडक्या, कक्षाचे पडदे धुणे, अशी कामे त्यांना करावी लागतात. साधारण दीडशे बेडशिट, पडदे, रुग्णांना परिधान केलेले कपडे धुतले जातात. परिचारिकांना गोळ्या-औषधे पुरवण्याचेच काम नाही तर स्वच्छता, कपडे धुणे, लहान बाळांना सांभाळण्यासारखी इतरही कामे करावी लागतात.

आशाताई क्षीरसागर म्हणाल्या, ‘‘कामाच्या स्तराबाबत कुठलाही कमीपणा वाटत नाही. आता जे काही करू ती सेवाच आहे. कधी-कधी परिस्थितीनुरूप सर्वच भूमिका बजावाव्या लागतात. परवा एका करोनाबाधित महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या चिमुकल्या बाळाला १४ दिवस सांभाळण्याची जबाबदारीही आम्ही निभावली. माझ्यासोबत सुनीता देशपांडे, मथुराबाई या असतात. आम्ही तिघी दररोज करोनाबाधित रुग्णांची कपडे, त्यांच्या खाटावरील बेडशिट, वॉर्डमधील पडदे हे सर्व धुण्याचे काम करतो. हायपोक्लोराइडमध्ये कपडे भिजू घालतो. साध्या पाण्यामध्ये बुडवतो. नंतर ते कपडे धुण्याच्या दोन यंत्रामध्ये टाकतो व कडक उन्हात वाळवण्याचे काम आम्ही करतो.’’

आशाताई या बेगमपुरा भागात राहतात. बेगमपुरा ते चिकलठाण्यातील शासकीय रुग्णालय हे तसे शहराच्या अंतराच्या मानाने दोन टोक. सकाळी त्या घरातला स्वयंपाक आदी आवरून रुग्णालयात दाखल होतात. येथील काम झाले पुन्हा सायंकाळी घरी. कुटुंबीयांबाबत त्या म्हणाल्या, ‘‘७८ वर्षीय वृद्ध आई घरात आहे. मी करोनाशी संबंधित रुग्णांच्या भागातच अधिक तास राहिल्याने आईच्या जवळ जात नाही. तिला स्वतंत्र खोली दिलेली आहे. घरी गेल्यानंतर स्वच्छ होते. संपूर्ण काळजी घेतल्यानंतरच स्वयंपाक करते. तेव्हा सुरुवातीला मुलगा मदत करतो. पण मीच त्याला काही अंतरावर राहायला सांगते. तेव्हा मुलगाच, मला ‘तुझी रुग्णसेवा ही देशसेवाच झालीय’ अशा शब्दांत बळ देतो. पतीही आरोग्याच्या मलेरिया विभागात काम करतात. एक बहीण आहे ती पोलीस विभागात कार्यरत आहे. आम्ही तीन सदस्य सेवेत आहोत.’’