|| बिपिन देशपांडे

कोळसा, पाणी मुबलक :- परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक सहा, सात आणि आठ हे तिन्ही संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. खडका धरणात मुबलक पाणी आणि कोळसा उपलब्ध होत असल्याने तिन्ही संचांतून मिळून ७५० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. विजेच्या गरजेनुसार यातील एखाद्दुसरा संच अधूनमधून बंद ठेवण्यात येत असला तरी संचाची रचनाच निकृष्ट असल्याने विद्युत केंद्र गुंडाळण्यात येणार असल्याविषयीची प्रशासकीय पातळीवरून होणारी चर्चाही थांबली आहे.

मराठवाडय़ातील अवर्षण स्थितीचा परिणाम वीजनिर्मितीवरही झालेला आहे. पुरेशा पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये जेमतेमच पाणीसाठा असे. वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे परळीतील वीजनिर्मिती करणारे संच कायम बंद ठेवण्यात येत होते. तिन्ही संचांना मिळून दररोज ६० हजार घनमीटर पाण्याची गरज लागते. त्यात कोळशाचा आणि त्यातही दर्जाचाही प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय तिन्ही संचांची बांधणीच मुळात फारशी समाधानकारक नसल्याचेही सांगितले जात असे. मात्र विद्युत प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांच्या मते संचाची बांधणी योग्य रीतीने झाली आहे. बीएचएल कंपनीकडून ही बांधणी झालेली असून ती जागतिक स्तरावरील एक नामांकित कंपनी आहे. मात्र पाणी उपलब्धता नसणे आणि कोळसा आयात करण्यासाठी रेल्वेसाठी देण्यात येणारे भाडे हे काहीशे कोटींमध्ये असल्याने वीजनिर्मितीचा खर्च कंपनीला जड जात होता.

कंपनीने संचनिहाय वीजनिर्मिती खर्चाचे एक धोरण आहे. मेरिट ऑर्डर डिस्पॅच (एमओडी) हे ते धोरण असून ज्या प्रकल्पांचा पाणी, कोळसा व कर्मचारी आदींचा खर्च पाहता स्वस्तात वीजनिर्मिती होते, असे प्रकल्प सुरू करण्याला प्रथम प्राधान्य द्यायचे आणि ज्यांचा खर्च जास्त येतो तो संच बंद ठेवायचा. यातील दुसऱ्या प्रकारात परळीतील वीजनिर्मितीचे संच टाकले गेले होते. परळीतील वीजनिर्मितीचा खर्च व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारा नाही, अशी वातावरणनिर्मिती प्रशासकीय पातळीवरून सुरू झालेली होती.

परळीतील प्रकल्प बंदच होईल, असे सांगून स्थानिक पातळीवरील काही कर्मचारी, अधिकारी वर्गाची चंद्रपूर, नागपूर, कोराडीसह इतर ठिकाणी बदली केली होती. त्याचा फटका परळीतील बाजारपेठेला बसू लागला. परळीतील बाजारपेठेचे मोठे अर्थकारण हे औष्णिक विद्युत केंद्र सुरू असण्यावरही बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. औष्णिक विद्युत केंद्रात अनेक कंत्राटदारांकडे कंत्राटी कामगार असून ते नजीकच्या परिसरातून परळीत स्थलांतरित झालेले आहेत. सतत संच बंद पडू लागल्यामुळे त्यांच्या हातचे कामही थांबले होते. त्याचा म्हणून परिणाम बाजारपेठेवरही जाणवू लागला.

प्रत्यक्षात वीजनिर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर प्रतियुनिट दर हा चंद्रपूरपेक्षा काहीसा जास्त, पण नाशिकच्या तुलनेत परळीतील वीजनिर्मिती खर्च स्वस्त आहे. चंद्रपूर प्रकल्पातील वीजनिर्मितीचा दर २ रुपये ५ पैसे असून परळीतून निर्मिती होणाऱ्या विजेचा दर ३ रुपये ५० पैसे असून नाशिकचा दर तीन रुपये ८० पैसे आहे.

मराठवाडय़ातील एकमेव असे औष्णिक विद्युत केंद्र परळीत आहे. गावचे अर्थकारण हे बऱ्याच प्रमाणात या केंद्रावर अवलंबून आहे. केंद्रातील कामाच्या निमित्ताने कंत्राटी कामगारांचेही स्थलांतर येथे व्हायचे. केंद्रामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा दहा हजार जणांच्या हाताला काम मिळायचे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह असे. मात्र मागील काही वर्षांत संच बंद ठेवण्यात येत असल्यामुळे त्याचे परिणाम बाजारपेठेवरही जाणवू लागले. आताही संच कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी रेल्वेने कोळसा आणण्यातील खर्चात काही सवलत मिळाली तर वीजनिर्मितीचा खर्चही कमी होऊ  शकतो आणि वीजनिर्मितीही आणखी स्वस्तात होऊ शकते. – चेतन सौंदळे, अभ्यासक