घाटी प्रशासनाला दिलासा

औरंगाबाद : शहरातील १२ रु ग्णांसह मराठवाडय़ातील रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी बुधवारी सांगितले. दरम्यान बुधवार दुपारी पाच वाजेपर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ३५ नमुने नकारात्मक आले. मात्र बीड जिल्ह्यतील आष्टी तालुक्यातील एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सात डॉक्टर आणि परिचारकाच्या पत्नीचा अहवाल करोना चाचणीला नकारात्मक आल्याने आरोग्य प्रशासनास थोडासा दिलासा मिळाला. आरोग्य कर्मचाऱ्यास लागण झाल्याने आरोग्य प्रशासनातील तपासण्या सुरु करण्यात आल्या होत्या. तसेच परिचारकाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी दुपापर्यंत पाठविण्यात आलेले ३५ लाळेचे नमुने करोना चाचणीला नकारात्मक आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

पीपीईच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

औरंगाबाद  प्रशासनाकडून घाटी रुग्णालयात देण्यात  आलेले ‘पीपीई’ साहित्य दर्जाहिन असल्याचा आरोप रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य कर्मचारी संघटनेच्या इंदुमती थोरात म्हणाल्या, देण्यात आलेले पीपीई कीट खराब दर्जाचे आहे. अगदी हातानेही ते कापड फाटते. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या जीवाशी हा खेळ असल्याचे सांगत त्यांनी एक चलचित्र माध्यमांपर्यंत पोहोचविले आहे.