परभणी : जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहण मोजणीच्या पार्श्वभूमीवर आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे सोमवारी(दि. २३) रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
या प्रकरणी आंदोलनाचे आयोजक खासदार संजय जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, कॉम्रेड अँड. माधुरी क्षीरसागर, प्रसाद गोरे आदींसह विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इतर दहा ते पंधरा शेतकऱी आंदोलकांविरूद्ध दैठणा पोलिसांत मंगळवारी(दि. २४) महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे रास्तारोकोचे आयोजन खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिंगणापूर फाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रसाद गोरे, गणेशराव घाडगे, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, पांडुरंग खिल्लारे, गंगाप्रसाद आणेराव, अँड. माधुरी क्षीरसागर, आत्माराम वाघ, पंढरीनाथ घुले, बंडू आव्हाड, पप्पू वाघ, मुंजा कुकर, जनशक्ती प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे आदींसह इतर दहा ते पंधरा शेतकरी आंदोलकांनी एकच जिद्द – शक्तिपीठ रद्द आणि महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस अंमलदार अमोल डुबे यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बळीराम मुंढे हे करीत आहेत.
दरम्यान शक्तिपीठ महामार्गाबाबत सहजपूर जवळा येथील शेतकरी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.२५) आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शासनाने जमीन मोजणीबाबत शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नये. शेतकऱ्यांची भावना समजून घेऊन त्यानंतरच निर्णय घ्यावा असे प्रतिपादन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकरी जमीन द्यायला तयार नाहीत. मग सरकार हा खटाटोप कोणासाठी करत आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला.

