छत्रपती संभाजीनगर :  नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द व्हावा, या मागणीसाठी आता विठ्ठलाकडे साकडे घालावे लागणार आहे. यासाठी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील शेतकरी १८ जुलै रोजी पंढरपूर येथे एकत्र येणार आहेत. आषाढी एकादशी निमित्त् बाधित शेतकरी एकत्र येणार असून पंढरपूर येथील वारकरी मैदानात शेतकऱ्यांची सभा घेतली जाणार आहे.

राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे शक्तिपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आता आंदोलनाचा पुढील टप्पा कोल्हापूरमधून  जाहीर करण्यात आला आहे. यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला असल्याचे लातूरमधील समन्वयक ॲड्. गजेंद्र येळकर यांनी कळवले आहे.

 आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत.

१३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा ,कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना ५० हजार कोटींचा बोजा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार आहे. आता पांडुरंगच न्याय देईल असे समन्वयक येळकर म्हणाले.

या सदबुध्दी यात्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील , विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे , महादेव जानकर , आमदार कैलास पाटील , कॅाम्रेड गिरीश फोंडे , उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह वरील सर्व जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार खासदार यात्रेस उपस्थित राहणार आहेत.