नांदेड : आपल्या कडक शिस्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हेडमास्तर’ म्हणून ओळखले गेलेले माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची मंगळवारी जयंती आहे. पण त्याच्या दोन दिवस आधीच रविवारी येथे झालेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रख्यात विधिज्ञ खासदार उज्ज्वल निकम यांच्यासह सर्वच वक्त्यांनी शंकररावांविषयीच्या संस्मरणीय बाबींना उजाळा दिला. खासदार या नात्याने दिल्लीमध्ये नांदेडची वकिली करण्याची ग्वाही निकम यांनी येथे दिली.

खासदार अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून शंकरराव आणि कुसुमताई चव्हाण दाम्पत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणार्‍या पुरस्कारांचे वितरण वरील सोहळ्यात करण्यात आले. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना शंकरराव चव्हाण जीवनगौरव तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, छत्रपती संभाजीनगरातील स्नेहसावलीचे डॉ.बालाजी आसेगावकर, उद्योजक मंदार भारदे आणि बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वरील पुरस्कारांचे वितरण खा.अशोक चव्हाण व खा.उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. शंकररावांमुळेच मी सर्वप्रथम १९८७ साली जळगावला सरकारी वकील झालो, असे निकम यांनी सांगितले. मराठवाड्याच्या विकासाचा मजबूत पाया शंकररावांनीच घातला. त्यांच्यानंतर नांदेडच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी अशोक चव्हाण पाठपुरावा करत असून गरज पडेल तेव्हा दिल्लीमध्ये नांदेडची वकिली करण्याची ग्वाही खा.निकम यांनी दिली.

नांदेडची एक वेगळी वीण स्पष्ट करताना सत्कारमूर्ती मंदार भारदे यांनी नरहर कुरुंदकरांच्या विवेक वादासोबत शंकररावांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सामाजिक समानता आणि एकतेची केलेली जोपासना याचा आवर्जून उल्लेख केला, तर दुसरे सत्कारमूर्ती डॉ.बालाजी आसेगावकर यांनी शंकरराव चव्हाण यांच्या दुरदृष्टीतून नांदेडला स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळातील आपण एक विद्यार्थी आहोत, याचा उल्लेख केला. स्नेहसावली संस्थेसंबंधी माहिती देऊन अशा संस्था वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद दोनवेळा तसेच केंद्र सरकारमध्ये विविध खात्याची मंत्रिपदे भूषविली. नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात त्यांनी मूल्यांशी कधीही प्रतारणा केली नाही, असे नमूद करून माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शंकररावांचे सार्वजनिक जीवन स्फटीकाप्रमाणे निष्कलंक राहिल्याचे नमूद केले.

वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा.चव्हाण यांचे सहकारी संतुका पांडागळे यांनी केले. आ.श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण व इतरांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावर माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.भीमराव केराम, आ.अमरनाथ राजूरकर, अ‍ॅड.किशोर देशमुख, अभिजीत देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.विश्वाधार देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन अभिजीत देशमुख यांनी केले.