छत्रपती संभाजीनगर येथे उद्या (२ एप्रिल) रोजी महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे. या सभेवरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं असून या सभेमुळे संभाजीनगरमधील परिस्थिती चिघळल्यास त्याला आयोजक जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला. एपीबी माझा वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमंक काय म्हणाले संजय शिरसाट?
“काँग्रेस पक्ष समाजात दूरी माजवतं असून या काँग्रेसला गाडले पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. पण उद्या उद्धव ठाकरेंच्या एका बाजुला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेस असेल. ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी आहे, याच्या यातना आम्हाला होतात”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा – “संभाजीनगरमधल्या दंगलीला वेगळा रंग देऊ नका, ती अंतर्गत…”, अजित पवारांनी विरोधी पक्षांसह माध्यमांचे कान टोचले
“त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांशी विचाराशी गद्दारी”
पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांची भव्य सभा पार पडली होती. त्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं होतं. त्या सभेसाठी कुठेही जाहिरात किंवा बॅनर लावण्यात आले नव्हते. तरीही लाखोंचा जनसागर मैदानावर जमला होता. आता याच मैदानात महाविकास आघाडीची सभा आहे. ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला, त्या मैदानावर त्यांच्या विचाराशी गद्दारी करण्याचा प्रयत्न होतो आहे”
“सभेनंतर परिस्थिती चिघळल्यास…”
दरम्यान, उद्याच्या सभेनंतर परिस्थिती चिघळल्यास त्याला आयोजक जबादार असतील, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. “दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन दंगली झाल्या आहेत. पोलिसांच्या गाड्या जाळल्या गेल्यात. संभाजीनगरमध्ये आजही तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत सभा घेणं बरोबर नाही. मात्र, त्यांना विरोध केला, तर आम्ही लोकशाहीचा गळा घोटतोय, असा आरोप ते करतील. त्यामुळे त्यांनी सभा घ्यावी, पण या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास त्यांना आयोजक जबाबदार असतील”, असं ते म्हणाले.